साखरपुड्याची अंगठी घालताना मुलीला गुडघ्यांवर बसायला लावल्याने मराठी अभिनेता ट्रोल

'बिग बॉस मराठी 3' फेम अभिनेत्याचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओमुळे अभिनेत्याला ट्रोल केलं जातंय.

साखरपुड्याची अंगठी घालताना मुलीला गुडघ्यांवर बसायला लावल्याने मराठी अभिनेता ट्रोल
Jay Dudhane
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 25, 2025 | 9:53 AM

‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता जय दुधाणे नुकताच लग्नबंधनात अडकला. गर्लफ्रेंड हर्षला पाटीलशी त्याने लग्नगाठ बांधली आहे. या वर्षी मार्च महिन्यात जयने तिला उत्तराखंडच्या ट्रिपदरम्यान लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्यानंतर नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानंतर लगेचच त्यांनी लग्नही उरकलं. या सर्व सोहळ्यांचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओवरून नेटकरी जयला तुफान ट्रोल करत आहेत. यामागचं कारण म्हणजे साखरपुड्याच्या वेळी अंगठी घालताना जयने हर्षलाला गुडघ्यावर बसायला सांगितलं. त्यामुळे मुलीला गुडघ्यावर बसायला लावल्यावरून नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आधी जय हर्षलाला अंगठी घालताना दिसत आहे. त्यानंतर जेव्हा हर्षला त्याला अंगठी घालायला जाते, तेव्हा जय तिला गुडघ्यावर बसण्याचा इशारा करतो. हे पाहून हर्षला हसू लागते आणि अंगठी घालण्यास हात पुढे करते. तेव्हा तो पुन्हा नकार देत तिला आणि खाली बसायला सांगतो. त्यानंतर हर्षला गुडघ्यावर बसून त्याला अंगठी घालते. तिने खरंच असं केल्याचं पाहून जयसुद्धा आश्चर्यचकीत होतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

घरच्या लक्ष्मीला गुडघ्यावर बसायला लावतोय हा.., असं एकाने म्हटलंय. तर ‘अशा प्रकारचा मुलगा मला कधीच न भेटो’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘ओव्हरस्मार्ट, ओव्हर कॉन्फिडंट.. बिग बॉस मराठीमध्येही हेच केलं’, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर काहींनी यात जयची बाजू घेतली आहे. ‘नवऱ्याने बसून अंगठी घातली तर ते प्रेम आणि बायकोने बसून घातली की तो मुलगा वाईट’, असं म्हणत काहींनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

जयची होणारी पत्नी ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून फॅशन आणि ट्रॅव्हलसंदर्भातील व्हिडीओ ती पोस्ट करते. जय आणि हर्षला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा पार पडला.