
बिग बॉसच्या घरात भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्यांची चांगलीच कान उघडणी करण्यात आली. अभिनेते रितेश देशमुख यांनी जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी यांच्यासह अरबाजचेही चांगलेच कान उपटले. जान्हवीला तर थेट तुरुंगात टाकण्याची शिक्षा दिली. निक्कीलाही तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. तसेच निक्कीच्या घरातील वागण्यावरही बोट ठेवलं. दुसऱ्यांचं ऐकून कोणताही विचार न करता घरातील सदस्यांसोबत निक्की कसे भांडते हे रितेश यांनी निक्कीला सर्वांसमोर सुनावलं. त्यामुळे निक्कीचा चेहरा चांगलाच पाहण्यासारखा झाला होता. विशेष म्हणजे निक्कीनेही आपली ही चूक मान्य केली आहे.
निक्की तांबोळीने पंढरीनाथ कांबळे यांना जोकर म्हटलं होतं. त्यावरून रितेश देशमुख यांनी निक्कीचे चांगलेच कान उपटले. इतकेच नाही तर जोकर कोण असतो? त्याचं महत्त्व काय असतं? हे सुद्धा रितेश देशमुख यांनी निक्कीला सांगितलं. यावेळी रितेश देशमुख यांनी जोकर म्हणजे काय? कुणाला म्हटलं जातं? हे स्पष्ट केलं. जोकरची व्याख्याच त्यांनी सांगितलं. जोकर जो असतो ना तो दोन जागी असतो. एक सर्कसमध्ये असतो. जेव्हा सर्कसमध्ये मोठमोठे प्राणी येतात, लोक घाबरतात. आता काय होईल? असं सर्वांना वाटतं. तेव्हा जोकर येऊन त्यांची भीती घालवतो. जेवढ्या टाळ्या सिंहाला पडतात तेवढ्याच टाळ्या जोकरला पडतात, असं रितेश देशमुख यांनी सांगितलं.
तो गेमचेंजर असतो
दुसरा जोकर पत्त्यात असतो. एक्क्यात जेवढी ताकद नसते ना तेवढी जोकरात असते. कारण तो हरलेली बाजू जिंकून देतो. गेम चेंजर. एकीकडे एंटरटेनर तर दुसरीकडे गेम चेंजर. हा जोकर पॅडी भाऊ असेल असं वाटतं तर तो त्यांचा मान आहे. कुणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. मी तर कुणाच्या बापाला घाबरत नाही हे बोलता ना… निक्की, अहो प्रेक्षकांना तरी घाबरा. ही कॅप्टन्सी एका आठवड्याची आहे. शो 100 दिवसांचा आहे. पुढच्या आठवड्यात काय होईल तुम्हाला माहीत नाही आणि मलाही माहीत नाही, असं रितेश यांनी निक्कीला सुनावलं.
तुम्हाला घरचे लोक चावी देतात
निकी तुम्ही हलक्या कानाच्या आहात. तुमची बुद्धी हलकी आहे. तुमचा आणि आर्याचा वाद झाला. त्यानंतर वर्षाजी (वर्षा उसगांवकर) आर्यांना समजावत होत्या. नको वाद वाढवू. शांत राहा. पण त्या (जान्हवी किल्लेकर) बाहेर आहेत ना? त्यांचं नाव घ्यायचं नाही. त्या (जान्हवी किल्लेकर) आल्या त्यांनी तुमचे कान भरले. तुम्ही काहीही विचार न करता पाय आपटत गेला. हिंमत असेल तर तोंडावर बोला असं म्हणाला. तुम्हाला काय माहीत वर्षाजी काय म्हणाल्या? कान भरले, लगेच जायचं आणि भांडायचं हा आहे निक्की फॉरमॅट. धनंजयने तुझे कानभरले आणि तुम्ही घनश्याम बरोबरचे भावाबहिणीचं नातं तोडलं. तुम्हाला गोष्ट बरोबर आहे की नाही, हे कळत नाही. तुम्ही घर चालवता? तुम्हाला वाटतं तुम्ही घर चालवता. नाही निक्की घरातील लोक तुम्हाला चालवतात. ते चावी मारतात आणि तुम्ही भांडत सुटता, असं त्यांनी सांगितलं.