Pooja Bhatt | ‘ऑडियन्सने जागा दाखवलीच’; अभिषेक मल्हानच्या अतिआत्मविश्वासावर पूजा भट्टचा टोमणा

आता सिझन संपल्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजाने अभिषेकला टोमणा मारला. 'मीच या शोला चालवत आहे', असा दावा अभिषेकने बिग बॉसच्या घरात केला होता. त्याला आता पूजाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

Pooja Bhatt | ऑडियन्सने जागा दाखवलीच; अभिषेक मल्हानच्या अतिआत्मविश्वासावर पूजा भट्टचा टोमणा
Abhishek Malhan and Pooja Bhatt
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 16, 2023 | 10:19 AM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. 14 ऑगस्ट रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने या शोचं विजेतेपद पटकावलं. तर एल्विशला तगडी टक्कर देणारा युट्यूबर अभिषेक मल्हान ऊर्फ ‘फुकरा इन्सान’ हा या शोचा पहिला रनर अप ठरला. ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलेल्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये अभिषेक आणि एल्विशसोबतच पूजा भट्ट, मनीषा राणी आणि बेबिका धुर्वे यांचा समावेश होता. आता सिझन संपल्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजाने अभिषेकला टोमणा मारला. ‘मीच या शोला चालवत आहे’, असा दावा अभिषेकने बिग बॉसच्या घरात केला होता. त्याला आता पूजाने सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘त्याच्या अशा ॲटिट्यूडला पाहून मला फार वाईट वाटतं’, असंही ती म्हणाली.

“मी इंडस्ट्रीत बऱ्याच लोकांना अशा प्रकारच्या परिस्थितींचा सामना करताना पाहिलं आहे. या इंडस्ट्रीत आधीसुद्धा बरेच महान लोक आले होते. पण आम्ही एक शॉट पाहून हे सांगू शकतो की कोण किती कमालीचा अभिनेता आहे. असा ॲटिट्यूड कधीच कामी येत नाही. अनेक लोक असा दावा करतात की आम्ही तुम्हाला असा चित्रपट दाखवू, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. पण अशा लोकांना ऑडियन्सच त्यांची जागा दाखवते”, अशा शब्दांत पूजाने सुनावलं.

याविषयी ती पुढे म्हणाली, “अनेकदा असं म्हटलं गेलं की अरे हा चित्रपट तर नक्की हिट होणार, पण त्याला ऑडियन्स रिजेक्ट करते. त्यात असेही काही चित्रपट होते, ज्यांना इंडस्ट्रीतील लोकांनी म्हटलं होतं की हे चालणार नाहीत. मात्र लोकांनी त्यांनाच सुपरहिट बनवलं. त्यामुळे मी असं म्हणेन की अतिआत्मविश्वास हा माणसाला कधी ना कधी त्याचं खरं अस्तित्व दाखवून देतो. अभिषेकच्या वागणुकीमुळे मी नाराज होते. कारण त्याच्या कामगिरीवर मला विश्वास होता.”

“मला वाटत होतं की अभिषेक बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार. यामुळे मी त्याला बऱ्याच टास्कदरम्यान मदतसुद्धा केली होती. मात्र त्याचा बदललेला स्वभाव पाहून मी त्याला एके दिवशी म्हणाले की, तू ट्रॉफी तर जिंकशील, पण त्याआधी त्याच्या लायक स्वत:ला बनव. बिग बॉसचे मागील काही सिझन पाहिले तर हे स्पष्ट होतं की जे लोक मनापासून खेळतात, तेच या शोचे विजेते ठरतात. अभिषेकवर जिंकण्याचा दबाव होता असं जरी मानलं तरी तो बिग बॉसच्या प्रवासाला एंजॉय करणंच विसरून गेला होता”, असंही पूजा भट्ट म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us