Elvish Yadav | हजारो गाड्यांचा ताफा, लाखोंची गर्दी, 12 किमीपर्यंत ट्रॅफिक जाम; एल्विश यादवचं शाही स्वागत

प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने बिग बॉस ओटीटीचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. हजारो गाड्यांचा ताफा, लाखोंची गर्दी.. असा त्याचा थाट होता. या स्वागताचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Elvish Yadav | हजारो गाड्यांचा ताफा, लाखोंची गर्दी, 12 किमीपर्यंत ट्रॅफिक जाम; एल्विश यादवचं शाही स्वागत
Elvish Yadav
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 27, 2024 | 10:56 PM

हरयाणा | 16 ऑगस्ट 2023 : हजारो गाड्यांचा ताफा.. लाखोंची गर्दी आणि त्याती एक झलक पाहण्यासाठी आतूर झालेले चाहते.. असा थाट ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवचा आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी एल्विशचा चाहतावर्ग हा एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीलाही मागे टाकणारा आहे. बिग बॉसचा सिझन संपल्यानंतर एल्विश जेव्हा त्याच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. एल्विश आर्मीने सेलिब्रिटी बनलेल्या आपल्या स्टारसाठी रस्त्यावर हजारो गाड्या उभ्या केल्या. त्याच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम इतका मोठा होता की त्याच्यासमोर बॉलिवूड सेलिब्रिटीही फिका पडेल.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर एल्विशला पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एल्विशच्या स्वागतासाठी गुजरातहून 1001 गाड्यांचा ताफा निघालेला पहायला मिळतोय. एखाद्या राजाप्रमाणेच त्यांनी त्याचं स्वागत केलं. तर एल्विशच्या टीमनेही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमालाही लाखो लोकांनी गर्दी केली होती.

बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडण्याआधीही एल्विशला भरघोस मतं मिळण्यासाठी आणि त्याला विजेता बनवण्यासाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चाहत्यांनी त्याच्यासाठी वोटिंग केली होती. तो विजेता झाल्यानंतर जियो टीमकडून सांगण्यात आलं होतं की अखेरच्या 15 मिनिटांत त्याला तब्बल 280 दशलक्ष मतं मिळाली होती. बिग बॉसच्या स्पर्धकासाठी एवढी क्रेझ पहिल्यांदाच पहायला मिळाली.

जवळपास आठ आठवड्यांच्या धमाकेदार सिझननंतर बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले सोमवारी पार पडला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड एण्ट्री घेणाऱ्या स्पर्धकाने ट्रॉफी जिंकली. घरात एण्ट्री करताच एल्विशने आपली दमदार खेळी दाखवली. बिग बॉसच्या घराबाहेरही एल्विशला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल 13.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर हरयाणाचा एल्विश हा कोट्यवधींचा मालक आहे. अवघ्या 25 व्या वर्षी एल्विशने हे यश संपादन केलं आहे.