
पाटणा | 27 फेब्रुवारी 2024 : बिहारमधील कैमूरमध्ये रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यामध्ये एका भोजपुरी गायक- अभिनेत्याचाही समावेश आहे. छोटू पांडे असे त्याचे नाव असून, या अपघातात तो मृत्यूमुखी पडला. मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवकाली गावाजवळ हा अपघात झाला. एका बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कॉर्पिओ गाडी दुभाजकावर आदळली आणि हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये अभिनेता-गायक छोटू पांडे याच्यासह बिहारच्या बक्सर येथील 6 जणांचाही समावेश आहे.
प्रकाश राय, अनु पांडे, सत्य प्रकाश मिश्रा, बजेश पांडे, आणि शशि पांडे यांचाही मृतांमध्ये समवेश आहे. अपघातानंतर संपूर्ण टीम गाडीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तेव्हाच मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोठ्या कष्टांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढले.
एवढंच नव्हे तर कानपूर येथील रहिवासी सिमरन श्रीवास्तव आणि मुंबईतील आंचल यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. हे सर्वजण छोटू पांडेसोबत काम करणारे कलाकार होते आणि छोटू पांडेसोबत चंदौली येथे एक कार्यक्रम करणार होते. त्या स्टेज शोसाठी जात असतानाच तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा अपघात झाला. अपघाताच्या या बातमीमुळे संपूर्ण भोजपुरी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
कोण होते छोटू पांडे ?
उदयोन्मुख गायक -कलाकार छोटू पांडे हे बक्सर जिल्ह्यातील घेवरिया गावचे रहिवासी होते. त्यांचे वडील शंकर पांडे हे पुरोहित असून, छोटू यांना चार भाऊ आहेत. उदयोन्मुख कलाकार असणाऱ्या छोटू पांडे यांना गाण्याची प्रेरणा त्यांचे आजोबा, विजय सागर पांडे यांच्याकडून मिळाली. तेही त्यांच्या काळातील नामवंत कलाकार होते. या अपघातानंतर छोटू पांडे यांच्या गावात शोककळा पसरली असून त्यांचे घरदार दु:खात बुडालं आहे.