रेखा यांना बळजबरी किस केल्याप्रकरणी 47 वर्षांनंतर अभिनेत्याने सोडलं मौन; म्हणाले ‘आजचे बेडरुम सीन्स तर..’
रेखा आणि बिस्वजीत यांच्याशी संबंधित हा जुना किसिंग सीन आजही हिंदी सिनेमाच्या इतिहासातील चर्चेत राहिलेल्या प्रसंगांपैकी एक मानला जातो. आता बिस्वजीत यांच्या नव्या वक्तव्यामुळे तो किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.

बॉलिवूडच्या जुन्या काळातील अनेक चित्रपट आणि त्यातील प्रसंग आजही चर्चेत असतात. अभिनेत्री रेखा आणि अभिनेता बिस्वजीत चॅटर्जी यांचा ‘दो शिकारी’ चित्रपटातील किसिंग सीनही असाच एक चर्चेचा विषय आहे. या सीनबाबत तब्बल 47 वर्षांनंतर बिस्वजीत चटर्जी यांनी आपली बाजू मांडली आहे. विशेष म्हणजे, याच संदर्भात त्यांनी रणबीर कपूरच्या ‘एनिमल’ चित्रपटातील इंटिमेट सीन्सचाही उल्लेख केला. रेखा यांनी 1979 मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं नाव ‘अंजाना सफर’ होतं, जो नंतर ‘दो शिकारी’ या नावाने प्रदर्शित झाला. या चित्रपटात बिस्वजीत चॅटर्जी त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होते. रेखा यांच्या जीवनावर आधारित पुस्तकात या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या एका किसिंग सीनचा उल्लेख करण्यात आला होता.
या पुस्तकातील माहितीनुसार, रेखा अवघ्या 15 वर्षांच्या असताना एका इंटिमेट सीनमध्ये बिस्वजीत यांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध किस केल्याचा दावा करण्यात आला होता. हा किसिंग सीन सुमारे पाच मिनिटे सुरू राहिल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं होतं. रेखा यांनी स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रसंगामुळे त्यांना मानसिक धक्का बसल्याचा दावा करण्यात आला होता.
47 वर्षांनंतर बिस्वजीत चॅटर्जी यांनी सोडलं मौन
आता या जुन्या वादावर बिस्वजीत चॅटर्जी यांनी भाष्य केलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आजच्या काळातील ऑन-स्क्रीन किसिंग आणि इंटिमेट सीन्सच्या तुलनेत त्या काळातील प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मांडला. त्यांच्या मते, आजच्या सिनेमात दाखवले जाणारे बेडरूम सीन्स पाहून ते स्वतःही आश्चर्यचकित झाले आहेत. “आजच्या काळात ऑन-स्क्रीन किसिंग ही काही मोठी गोष्ट नाही. आजकाल काँट्रोव्हर्सीला काही महत्त्व नाही. पडद्यावरील किसिंग सीन्सना काही किंमत राहिलेली नाही. आजकालचे बेडरुम सीन्स धक्कादायक आहेत. ‘एनिमल’मधील अशी दृश्ये पाहून मला धक्काच बसला होता. रेखा यांनी नंतरही माझ्यासोबत चित्रपटात काम केलं. मी त्या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक होतो. मी त्यांच्याशी बोललो. वाद तर होणारच होता, हे मुद्दे तर निर्माण होणारच होते”, असं ते म्हणाले.
बिस्वजीत यांनी या वादानंतरही रेखासोबत त्यांचं व्यावसायिक नातं कायम राहिल्याचं सांगितलं. त्यांनी रेखा आपल्या एका चित्रपटात काम करत असल्याचाही उल्लेख केला. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रसंगाबाबत त्यांची भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे.