
Netflix Series : बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी सध्या डिजिटल विश्वात आपली सत्ता 25करताना दिसत आहे. 2026 सालाची सुरुवात इमरानसाठी अत्यंत दमदार ठरली असून नेटफ्लिक्सवर सलग दोन मोठ्या रिलीजमुळे त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आधी ‘हक’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर आता ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ या वेब सीरिजने इमरान हाशमीला डिजिटल स्पेसचा नवा ‘किंग’ बनवले आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ ही वेब सीरिज केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवरही प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. गेल्या आठवड्यात ही सीरिज जगातील तब्बल 20 देशांमध्ये नेटफ्लिक्सच्या टॉप 10 नॉन-इंग्लिश शोजच्या यादीत ट्रेंड होत होती. विशेष म्हणजे यापैकी 10 देशांमध्ये ‘तस्करी’ने थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली, ही बाब या सीरिजच्या अफाट लोकप्रियतेची साक्ष देणारी आहे.
‘तस्करी’ने असा विक्रम केला आहे, जो गाठणे प्रत्येक शोच्या आवाक्याबाहेरचे आहे. अवघ्या 12 दिवसांमध्ये या सीरिजने अनेक मोठे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. रिलीजच्या पहिल्या दोन आठवड्यांतच ‘तस्करी’ तब्बल 5 कोटी 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी भक्कम कथा, वेगवान मांडणी आणि इमरान हाशमीची दमदार भूमिका यामुळे ही सीरिज सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
नेटफ्लिक्सने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 19 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान ‘तस्करी’ने दुसऱ्या आठवड्यातही आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. या कालावधीत सीरिजला 3.9 मिलियन लोकांनी पाहिलं आहे. याचसोबत ही सीरिज नेटफ्लिक्सच्या ग्लोबल टॉप 10 नॉन-इंग्लिश शोजच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहिली. सध्या या यादीत साऊथ कोरियन रोमँटिक कॉमेडी ‘कॅन दिस लव्ह बी ट्रान्सलेटेड?’ पहिल्या क्रमांकावर आहे.
7 भागांची ‘तस्करी’ ही सीरिज सध्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. नीरज पांडे आणि राघव जयरथ यांनी या सीरिजचे संयुक्त दिग्दर्शन केले आहे. कथानकासोबतच इमरान हाशमीच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत असून त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. इमरानसोबतच या सीरिजमध्ये शरद केळकर, नंदीश सिंह संधू आणि अमृता खानविलकर यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. ‘तस्करी’ला IMDb वर 7.2 अशी चांगली रेटिंग मिळाली आहे.