आमिर खानही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर? त्या एका गोष्टीमुळे सुरक्षेत मोठी वाढ; नेमकं काय घडलं?

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आमिर खानच्या घराचीही रेकी करण्यात आली होती. यामुळे 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात आली आहे.

आमिर खानही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर? त्या एका गोष्टीमुळे सुरक्षेत मोठी वाढ; नेमकं काय घडलं?
aamir khan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 12:32 PM

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. धक्कादायक म्हणजे बिश्नोई तुरुंगात असूनही त्याच्या कारवाया सुरू आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यावेळी या आरोपींनी अनेक बड्या स्टार्सच्या घराची रेकी केल्याची कबुली दिली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या घराचीही रेकी करण्यात आल्याचं आरोपींनी कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींच्या कबुलीनंतरच आमिर खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आमिर खान कोणत्याही वादात पडत नाही, असं असतानाही तो बिश्नोई गँगच्या रडारवर का आला? अशी चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेता आमिर खान कोणत्याही वादात नसतो. असं असतानाही त्याच्या घराची रेकी झाल्याचं उघड झालं आहे. आमिरसह अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी झाल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी आमिर खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. वांद्रे पश्चिमेला कार्टर रोडवर असलेल्या फ्रीडा वन या आमिर खानच्या जुन्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Loading...

बाईक पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी ज्या बाईकचा वापर केला होता, ती बाईक सध्या जुहू पोलीस ठाण्यात आहे. जुहू पोलिसांनी या प्रकरणी बाईक मालकाची देखील चौकशी केली आहे. आरोपींनी ही बाईक 25 हजार रुपयांना विकत घेतली होती. याच बाईकवरून अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी करण्यात आली होती. त्यानंतर टायगर श्रॉफला आपले लक्ष्य बनवले आणि 18 तारखेच्या संध्याकाळी जेव्हा टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला, तेव्हा याच बाईकवरून तिन्ही आरोपी फरार झाले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

रिक्षातून फिरायचे…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबई फिरण्यासाठी रिक्षाचा वापर करायचे. त्यावेळी ते बॉलिवूडच्या हिरोंचं घर दाखवण्याचा आग्रह रिक्षा चालकांना करायचे. त्यांना सेलिब्रिटींच्या घराचे फोटो घ्यायचे होते. वेगवेगळ्या रिक्षा चालकांनी त्यांना सेलिब्रिटींची घरे दाखवली. ज्या सेलिब्रिटीच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कमी असेल अशा सेलिब्रिटीला टार्गेट करण्याचं काम या तिघांवर सोपवण्यात आलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या वृत्ताला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us