Abhishek Bachchan: ‘कान फिल्म फेस्टिव्हल’वरून परतताच अभिषेकला मिळाली दु:खद बातमी; सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

अभिषेकच्या या पोस्टवर त्याची बहीण श्वेता बच्चननेही प्रतिक्रिया लिहिली. 'अनेक आठवणी आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो', असं तिने लिहिलं. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, बॉबी देओल, निम्रत कौर, डब्बू रत्नानी, मनिष मल्होत्रा यांनीसुद्धा कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Abhishek Bachchan: कान फिल्म फेस्टिव्हलवरून परतताच अभिषेकला मिळाली दु:खद बातमी; सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट
Abhishek Bachchan
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 8:59 AM

75व्या आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्यासह भारतात परतला. मात्र घरी परतताच त्याला दु:खद बातमी मिळाली. प्रसिद्ध सूट स्टायलिस्ट अकबर शाहपुरवाला (Akbar Shahpurwala) यांच्या निधनानंतर अभिषेकने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. अकबर आणि बच्चन कुटुंबीयांचं खूप जवळचं नातं होतं. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे सूट्स तेच शिवायचे. इतकंच नव्हे तर अभिषेक लहान असताना त्याचा सर्वांत पहिला सूटसुद्धा अकबर यांनीच शिवला होता. अकबर यांना तो ‘अक्की अंकल’ म्हणूनच हाक मारायचा. ‘अकबर’ यांच्या सूट लेबलचा फोटो पोस्ट करत अभिषेकने शोक व्यक्त केला.

अभिषेकची पोस्ट-

‘घरी आल्यावर अत्यंत दु:खद बातमी समजली. फिल्मी जगतातील एक महान व्यक्ती अकबर शाहपुरवाला यांचं निधन झालं. मी त्यांना अक्की अंकल म्हणायचो. त्यांनी माझ्या वडिलांचे अनेक पोशाख बनवले. जेवढं मला आठवतंय, त्यांनी माझ्या वडिलांचे आणि माझेसुद्धा अनेक सूट्स शिवले आहेत. माझ्या चित्रपटांसाठी त्यांनी सूट्स तयार केले. त्यांनी माझा पहिला सूट शिवला होता, जो मी रेफ्युजी या चित्रपटाच्या प्रीमिअरला परिधान केला होता. अजूनही तो सूट मी जपून ठेवला आहे’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

‘जर तुमचा पोशाख किंवा सूट कचिन्स आणि त्यानंतर गबाना यांनी बनवला असेल, तर तुम्ही स्टार झालात असं समजा. एवढा त्यांचा फिल्म इंडस्ट्रीत प्रभाव होता. जर त्यांनी स्वत: तुमच्या सूटचा कापड कापला असेल, तर त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं समजायचं. ते मला नेहमी म्हणायचे की, सूटचं कापड कापणं म्हणजे फक्त शिवणकाम नाही, तर त्या भावना आहेत. जेव्हा तू माझा सूट परिधान करतोस, तेव्हा त्यातील प्रत्येक धागा, शिलाई ही प्रेमाने आणि माझ्या आशीर्वादाने विणलेली असते. माझ्यासाठी ते जगातील सर्वोत्कृष्ट सूट मेकर होते. आज मी तुम्ही शिवलेला सूट परिधान करेन, अक्की अंकल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो’, असं त्याने पुढे लिहिलं.

अभिषेकच्या या पोस्टवर त्याची बहीण श्वेता बच्चननेही प्रतिक्रिया लिहिली. ‘अनेक आठवणी आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो’, असं तिने लिहिलं. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, बॉबी देओल, निम्रत कौर, डब्बू रत्नानी, मनिष मल्होत्रा यांनीसुद्धा कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन यांनीसुद्धा अकबर यांच्यासाठी पोस्ट लिहित शोक व्यक्त केला.