VIDEO : आधी इमारतीवरुन माकडासारख्या उड्या मारल्या अन् 4 तासाने… मुंबईत तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा
दादर स्थानकाबाहेर एका विवस्त्र तरुणाने इमारतीवर चढून ४ तास गोंधळ घातला. एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उड्या मारणाऱ्या या तरुणाला अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुरक्षित वाचवले.

मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी पहाटे एका तरुणाने केलेल्या कृत्याने संपूर्ण प्रशासनाची झोप उडाल्याचे पाहायला मिळाले. एका विवस्त्र तरुणाने इमारतीवर चढून तब्बल चार तास हायव्होल्टेज ड्रामा केला. कधी इमारतीच्या सज्जावर बसणे, तर कधी एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर माकडासारख्या उड्या मारणे, अशा कृत्यामुळे प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकला होता. अखेर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाला सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात यश आले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार पहाटेच्या 5.15 च्या सुमारास सुरू झाला. दादर स्थानकाबाहेरील एका इमारतीवर हा तरुण चढल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, या तरुणाच्या अंगावर कपडे नव्हते आणि तो अत्यंत विचित्र हालचाली करत होता. तो मानसिकदृष्ट्या खचलेला किंवा मनोरुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला आणि अग्निशमन दलाला फोन केला.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा हा तरुण इमारतीच्या मजल्यावरील सज्जावर उभा होता. यावेळी बचाव पथकाने त्याला खाली उतरवण्यासाठी शिडी लावली आणि त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र जवान जवळ पोहोचताच तो तरुण माकडासारखा दुसऱ्या इमारतीच्या गॅलरीत उडी मारत होता. तो या कामात इतका सराईत वाटत होता की जवानांना त्याच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते.
दादर पोलिसांकडून तपास सुरु
तो तरुण खाली कोसळण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलाने खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीजवळ मोठ्या जाळी पसरवली होती. जेणेकरून जर त्याने उडी मारली किंवा तो पडला, तर त्याला गंभीर इजा होऊ नये. यामुळे पोलीस आणि जवान त्याला सातत्याने शांत राहण्याचे आवाहन करत होते. सकाळी साधारण ९ वाजेपर्यंत हा थरार सुरू होता. पोलिसांनी त्याला विश्वासात घेतले आणि बराच वेळ समजावल्यानंतर अखेर तो तरुण शांत झाला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप खाली उतरवले. प्राथमिक चौकशीत हा तरुण गतिमंद असावा, अशी माहिती समोर येत आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तो नेमका कुठून आला आणि इमारतीवर का चढला, याचा तपास दादर पोलीस करत आहेत.
