
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर आपली खास छाप पाडणारा अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना. आयुष्मानने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. त्याने वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्याच्या चित्रपटांसोबतही त्याचे वैयक्तिक आयुष्यही फार चर्चेत राहिलं. आयुष्मानने त्याची शाळेतील मैत्रिण ताहिरा कश्यपसोबत लग्न केलं.
आयुष्य सावरण्यासाठी थोडा वेळ लागला.
आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांनी वयाच्या अवघ्या 24 वर्षी लग्न केलं. तेव्हा आयुष्मानचे अजून चित्रपटसृष्टीत तेवढे नाव नव्हते आणि ताहिरा तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होती. त्यामुळे लग्नानंतर मुंबईत आलेल्या या नवदांपत्याला आपलं आयुष्य सावरण्यासाठी थोडा वेळ लागला.
ती एकटीच घरासाठी किराणा खरेदी करत होती
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ताहिराने सांगितलं की, मुंबईत आल्यानंतर तिने आपली सगळी बचत खर्च केली कारण ती एकटीच घरासाठी किराणा खरेदी करत होती आणि हे जवळपास एक वर्षभर चाललं. या काळात आयुष्मानला हे लक्षातच आलं नाही की घरातलं सगळं खाण्याचं सामान ताहिराच खरेदी करत आहे आणि त्याने त्यासाठी पैसे दिलेले नाहीत. याच काळात आयुष्मानने व्हीजे म्हणून आपलं करिअर सुरू केलं होतं.
आयुष्मानला याची काहीच जाणीव नव्हती
मुलाखतीत ताहिराने सांगितलं की, 2008 मध्ये आयुष्मानसोबत लग्नानंतर ती मुंबईत आली तेव्हा तिच्याकडे स्वतःची बचत होती कारण ती अनेक वर्षांपासून काम करत होती आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होती. ती म्हणाली की , “मी माझ्या लग्नासाठी काही पैसे खर्च केले होते, पण माझ्याकडे माझी बचत होती. पण मुंबईत मला नोकरी नव्हती. आमचं लग्न झालं होतं आणि मी अजूनही नोकऱ्यांसाठी अर्ज करत होते,”. पुढे म्हणाली,आयुष्मानला याची काहीच जाणीव नव्हती की ती तिच्या बचतीतून घरासाठी किराणा सामान किंवा इतर काही खरेदी करत आहे.
माझ्या आई-वडिलांकडूनही कधीही पैसे मागितले नाही
“हा मुलगा समजूच शकला नाही की आपण हे खाण्याचं सामान, भाज्या, फळं कशी खरेदी करतोय. माझं बँक बॅलन्स संपत चाललं होतं. मी कधीही कोणाकडून पैसे मागितले नाहीत, अगदी माझ्या आई-वडिलांकडूनही नाही. कारण मी नेहमीच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते, पण आता सगळं गोंधळलं होतं कारण एक वर्ष झालं होतं आणि माझं बँक बॅलन्स शून्यावर आलं होतं.”
लग्नाच्या सुरुवातीचे दिवस
ताहिराने एका प्रसंगाची आठवण सांगितली जेव्हा आयुष्मानने तिला विचारलं की “तू आंबे का आणले नाहीस.”, तेव्हा हा प्रश्न ऐकून तिला खूप राग आला. तिने सांगितले की, “मला खूप राग आला होता कारण त्याने हे पाहिलं नव्हतं की मी दोन दिवसांपासून आंबे खाल्ले नव्हते, कारण त्याला आंबे खाता यावे म्हणून. तेव्हा त्याने विचारलं, ‘काय प्रॉब्लेम आहे?’ आणि मी तेव्हा रडायला लागले. मी विचारलं, तुला काय वाटतं आपण किराणा सामान कसं खरेदी करतोय?, माझं बँक बॅलन्स शून्य होत आलं आहे. सात-आठ महिने झाले आणि मी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतेय आणि आपण फक्त माझी बचत खर्च करतोय.’ तेव्हा त्याला जाणीव झाली आणि तो म्हणाला, ‘तू माझ्याकडून पैसे का मागितले नाहीस?’ हा प्रसंग सांगत तिने त्यांचे सुरुवातीचे दिवस कसे होते त्याबद्दल सांगितलं.