मेरा कुछ सामान… दादा कोंडकेंनी लिहिलं असतं तर? डबल मिनिंग आरोपांवर कुणी दिलं उत्तर?
अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळाला, पण त्यांच्या गाण्यांवर 'डबल मिनिंग'चे आरोप झाले. या आरोपांना लेखिका अनिता पाध्ये यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गुलजार यांच्या 'मेरा कुछ सामान...' गाण्याचे उदाहरण देत, प्रतिमा महत्त्वाची असते हे त्यांनी स्पष्ट केले. दादांची अफाट क्रेझ आणि आजच्या कलाकारांशी त्यांची तुलना यात मांडली आहे.

लोकप्रिय अभिनेते दादा कोंडके यांचे सिनेमे नेहमीच हाऊसफुल्ल ठरले आहेत. शहर असो की ग्रामीण भाग दोन्हीकडे दादांच्या सिनेमांना प्रचंड प्रतिसाद असायचा. दादांचा सिनेमा येण्याची लोक जणून वाटच पाहायचे, इतकी अफाट लोकप्रियता दादांची होती. पण दादांवर जीव ओवाळून टाकणारे लोक जसे होते, तसेच दादांना नावं ठेवणारी मंडळीही होती. कारण काय तर म्हणे दादांच्या सिनेमातील गाणी डबल मिनिंगची असतात. दादा अश्लील गाणी लिहितात, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला गेला. त्याला दादांनी सडेतोड उत्तरही दिलं आहे. दादांचं आत्मचरित्र लिहिणाऱ्या प्रसिद्ध लेखिका, ज्येष्ठ पत्रकार अनिता पाध्ये यांनीही या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
लेखिका अनिता पाध्ये यांनी लोकमत फिल्मीला दिलेली एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाखत जुनी असली तरी त्यांनी दिलेलं उत्तर समर्पक आहे. दादांना डबल मिनिंगसाठी नाव ठेवतात. पण दादांनी मनोरंजनही तेवढंच केलं. दादांच्या गाण्यांवर डबल मिनिंग म्हणून टीका केली जाते. त्याच माणसाने अंजनीच्या सुता… हे गाणं लिहिलं, त्यावर कुणी बोलत नाही. गुलजार साहेबांचं मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है… हे गाणं आहे. हे आयकॉनिक साँग आहे. पण ते गुलजार साहेबांनी लिहिलंय म्हणून कुणी काही बोलत नाही. तेच दादांनी लिहिलं असतं तर… मेरा कुछ सामान… हे डबल मिनिंग म्हटलं गेलं असतं. म्हणजे तुमची प्रतिमा कशी असते त्यावर लोक जज करतात, असं अनिता पाध्ये म्हणाल्या.
अन् 10 मिनिटात 100 लोक आले
दादांच्या निधनाच्या आठ दिवसा आधीची गोष्ट होती. दादांची बहीण लिलाबाई पुण्याला राहायच्या. लिलाबाईंना सर्वजण आत्याबाई म्हणत. त्यांच्याकडे दादांच्या बालपणीच्या आठवणी होत्या. मी त्यांना पुण्याला भेटायला गेले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. मी मुंबईला निघणार होते. तेव्हा दादा म्हणाले, उद्या मी मुंबईला जाणार आहे. तू राहा आज. आपण सोबत जाऊ. मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो. त्यावेळी दादांची क्रेझ कळली. जिथे जिथे सिग्नल लागायचा, तिथे दादांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची.
आम्ही खोपोलीला दादांच्या फॉर्महाऊसवर आलो. तेव्हा दादा आल्याचं कळताच अवघ्या 10 मिनिटात 100 लोक त्यांना पाहण्यासाठी आले होते. ही दादांची क्रेझ होती. आणि आताचे आर्टिस्ट एअरपोर्टवर दिसतात. ते स्वत:च मीडियाला बोलावतात. नाही तर कोणता कलाकार विमानतळावर येणार याचं कुठे मीडियाला स्वप्न पडलंय? हे कलाकार जीम करतानाचे फोटो व्हायरल करतात. चर्चेत राहण्यासाठी ही धडपड असते. पण तुम्ही स्टार आहात तर तसं लांबच राहिलं पाहिजे, तरच तुमची क्रेझ वाढते. रोज रोज दिसल्यावर आकर्षण कसं वाढेल? असा सवाल त्यांनी केला.