“विकी कौशल माझ्या रडारवर कधीच नव्हता पण..”; कतरिनाने सांगितली लव्ह-स्टोरी

कॉफी विथ करणच्या दहाव्या एपिसोडमध्ये कतरिनाने इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत हजेरी लावली. हा एपिसोड येत्या गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.

विकी कौशल माझ्या रडारवर कधीच नव्हता पण..; कतरिनाने सांगितली लव्ह-स्टोरी
Katrina Kaif, Vicky Kaushal
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 07, 2022 | 1:32 PM

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नुकतीच कतरिनाने ‘कॉफी विथ करण 7’च्या (Koffee With Karan) एपिसोडमध्ये हजेरी लावली. विशेष म्हणजे याच टॉक शोमध्ये कतरिनाने विकीला जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. कॉफी विथ करणच्या दहाव्या एपिसोडमध्ये कतरिनाने इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत हजेरी लावली. हा एपिसोड येत्या गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. विकी कौशल कधीच माझ्या ‘रडार’वर नव्हता, असं ती या शोमध्ये म्हणाली.

“मला त्याच्याबद्दल फार काही माहीत नव्हतं. त्याचं नाव मी ऐकलं होतं, पण काम करण्याची संधी कधी मिळाली नव्हती. पण जेव्हा मी त्याला भेटले, तेव्हा त्याने माझं मन जिंकलं”, अशा शब्दांत कतरिना विकीविषयी व्यक्त झाली. विकी आवडल्याचं सर्वांत आधी तिने दिग्दर्शक झोया अख्तरला सांगितलं होतं. विशेष म्हणजे झोयाच्याच पार्टीमध्ये दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती.

विकीसोबतचं नातं अनपेक्षित असल्याचं म्हणत कतरिनाने पुढे सांगितलं, “हे माझ्या नशिबात लिहिल होतं आणि हे घडणारच होतं. आम्हा दोघांमध्ये इतके योगायोग जुळून आले की एके क्षणी मला हे सर्व एखाद्या स्वप्नासारखंच वाटत होतं.” कतरिना आणि विकीने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. यावेळी दोघांचे कुटुंबीय आणि मोजका मित्रपरिवार उपस्थित होता.

कॉफी विथ करणच्या या एपिसोडमध्ये करणने तिला ‘सुहागरात’विषयीसुद्धा प्रश्न विचारला. ‘सुहागरात’ नावाची गोष्टच नसते, कारण तुम्ही खूप थकलेले असता, असं आलियाने आधीच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं. त्याचा संदर्भ घेत करणने कतरिनाला तोच प्रश्न विचारला. त्यावर कतरिना मिश्किलपणे म्हणाली, “आपण त्याला सुहाग दिन का नाही म्हणू शकत?”

कतरिना लवकरच ‘फोन भूत’ या हॉरर कॉमेडीमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत झळकणार आहे. हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती विजय सेतुपतीच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. सलमान खानसोबत तिचा ‘टायगर 3’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.