Mukesh Khanna: मुकेश खन्ना यांची नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नीवर सडकून टीका, म्हणाले “तुम्ही मूर्ख आहात”

| Updated on: Aug 10, 2022 | 4:02 PM

रत्ना यांनी एका मुलाखतीदरम्यान करवा चौथ (karwa chauth) या हिंदू सणाला सनातनी आणि अंधश्रद्धाळू ठरवत महिलांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मुकेश खन्ना यांनी रत्ना पाठक शाह यांना मूर्ख म्हटलंय.

Mukesh Khanna: मुकेश खन्ना यांची नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नीवर सडकून टीका, म्हणाले तुम्ही मूर्ख आहात
Mukesh Khanna: मुकेश खन्ना यांची नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नीवर सडकून टीका
Image Credit source: Twitter
Follow us on

अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) यांच्यावर सडकून टीका केली आहे. हिंदू सणांवर वादग्रस्त विधाने केल्याबद्दल ‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्ना यांनी रत्ना पाठक शाह यांची निंदा करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. रत्ना यांनी एका मुलाखतीदरम्यान करवा चौथ (karwa chauth) या हिंदू सणाला सनातनी आणि अंधश्रद्धाळू ठरवत महिलांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मुकेश खन्ना यांनी रत्ना पाठक शाह यांना मूर्ख म्हटलंय. ‘पती तर पती, पत्नी बाप रे बाप,’ असं त्यांनी या व्हिडीओत म्हटलंय.

आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करत मुकेश खन्ना म्हणाले, “नसीरुद्दीन शाह यांनी मी एक उत्तम अभिनेता म्हणू शकतो. एक अद्भुत माणूस. आपल्या कामात व्यस्त असतात. पण का कळत नाही, कधी धर्म किंवा मध्येच अशी एखादी गोष्ट येते, ज्यामुळे ते बेजबाबदार विधानं करू लागतात. जी विधानं खान ब्रदर्सच्या तोंडूनही निघून जातात, अशी विधानं ते करतात. पण नसीरुद्दीन शाह जे म्हणतात ते मी समजू शकतो. तो त्यांचा धर्म आहे. पण त्यांची पत्नी जे म्हणते ते मी त्यांचा धर्म मानू शकत नाही. कारण त्या आपल्या नावापुढे रत्ना पाठक शहा असं लिहितात. म्हणजेच त्यांनी पाठक या आडनावाला अजूनही जिवंत ठेवलंय. असं असूनदेखील त्या असं बालिश वक्तव्य करत आहेत.

काय म्हणाल्या रत्ना पाठक शहा?

रत्ना पाठक शहा यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं होतं की, ती पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्या करवा चौथचा उपवास करतात का? त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मी वेडी आहे का? असा उपवास कोण करणार? नवर्‍याच्या दीर्घायुष्यासाठी सुशिक्षित स्त्रियाही उपवास करतात हे आश्चर्यकारक आहे. विधवा होणं ही भारतातील भयंकर परिस्थिती आहे, या भीतीपोटी महिला करवा चौथचा उपवास करतात. एकविसाव्या शतकातही आपण असं बोलतो याचं आश्चर्य वाटतं.”

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले मुकेश खन्ना?

रत्ना पाठक शाह यांच्या या वक्तव्यावर मुकेश खन्ना संतापले. ते म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही शिकलेले आहात? सुशिक्षित बायका सोडा, गावातल्या बायका सोडा, अशिक्षित बायका सोडा, मोठ्या घरातील बायकासुद्धा करवा चौथचा उपवास करण्यात अभिमान बाळगतात. या सुंदर उत्सवाला तुम्ही अंधश्रद्धा म्हणता. चला अंधश्रद्धा का असेना पण जर पत्नी आपल्या पतीच्या सुखासाठी, पतीच्या आयुष्यासाठी अंधश्रद्धेत राहूनही एक दिवसाचा उपवास ठेवत असेल आणि चंद्र पाहून आपलं व्रत पूर्ण करत असेल तर यापेक्षा सुंदर काय असू शकतं?”

“हे सुशिक्षित लोक स्वतःला इतके सुशिक्षित समजतात की ते देशाविरोधी आणि धर्माविरोधी काहीही बोलतात. जो धर्म तुम्ही विवाहाच्या वेळी अंगीकारला आहे, तो धर्म आता तुमच्यावर अधिकार गाजवतोय असं मी मानू का? असं असेल तर तुम्ही तुमच्या नावापुढे पाठक का लिहिता? ते आडनाव काढून टाका,” अशा शब्दांत त्यांनी रत्ना पाठक शाह यांच्यावर निशाणा साधला. एवढंच नाही तर मुकेश खन्ना यांनी रत्ना यांना मूर्ख देखील म्हटलं आहे.

“तुम्ही मूर्ख आहात. शिक्षण तुम्हाला हे सर्व शिकवतं का? तुम्ही कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं आहे? हिंदू धर्मात जे काही चाललं आहे ते अंधश्रद्धा आहे आणि इतर कोणत्याही धर्मात जे काही चाललं आहे ते अंधश्रद्धा नाही असं कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे. म्हणजे आपण सगळेच अंधश्रद्धेत जगतोय का? मी तुम्हाला सांगतो की आमचा विश्वास तुमच्यापेक्षा चांगला आहे. आमचा धर्म श्रद्धेवर चालतो,” असं ते म्हणाले.