नाना पाटेकरांनी अमिताभ यांना असं काय सांगितलं, ज्यामुळे बिग बी अवघडले? त्या गोष्टीची होतेय चर्चा

नाना पाटेकर त्यांच्या 'वनवास' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्यासोबत आले होते. यावेळी नानांनी शहर सोडून गावाकडे राहण्यामागचे कारण सांगितले. त्यांनी अमिताभ यांनाही गावाकडे येण्याची गळ घातली, ज्यामुळे बिग बी विचारात पडले आणि थोडे अवघडले. त्यांच्या या अनोख्या संवादाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

नाना पाटेकरांनी अमिताभ यांना असं काय सांगितलं, ज्यामुळे बिग बी अवघडले? त्या गोष्टीची होतेय चर्चा
nana patekar amitabh bachchan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 9:02 PM

नाना पाटेकर यांचा 20 डिसेंबर 2024 रोजी ‘वनवास’ हा सिनेमा रिलीज झाला होता. त्या चित्रपटात त्यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नाना पाटेकर हे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 16’च्या सेटवर आले होते. यावेळी दोन्ही अभिनेत्यांनी भरपूर गप्पा मारल्या. नाना पाटेकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या. आपण शहर सोडून गावाकडे का राहतो याचं कारणही सांगितलं. यावेळी नाना पाटेकर यांनी अमिताभ बच्चन यांना एक अशी गोष्ट सांगितली, ज्यामुळे अमिताभही विचारात पडले होते. थोडेसे अवघडले होते. काय होती ही गोष्ट?

90च्या दशकात नाना पाटेकर यांनी खूप काम केलं होतं. नंतर नाना पाटेकर यांनी सिनेमात काम करण्याचं सोडून दिल्याची काही वर्षांपूर्वी बातमी आली. नाना गावात राहत असल्याचे फोटोही आले. त्यांचं साधं आयुष्य जगणं या फोटोतून दिसत होतं. या सर्वांवर नानांनी केबीसीत मनमोकळेपणानं सांगितलं.

Loading...

अनेक प्रश्नांची दिली उत्तरं

यावेळी अमिताभ यांनी नाना पाटेकर यांना अनेक सवाल केले. नानांही तितक्याच तत्परतेने उत्तरे दिली. एवढी प्रसिद्धी मिळवल्यानंतर, देशासाठी मोठं योगदान दिल्यानंतर तुम्ही हे सर्व सोडून गावाकडे राहायला का गेले?, असा सवाल अमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारला. त्यावर, मी इंडस्ट्रीचा नाहीये. मी इथे येतो, काम करतो आणि परत निघून जातो. मी कोणत्याही पार्ट्यांना जात नाही. मला पार्ट्या करणं कधी भावलंच नाही. म्हणजे मी तिथे स्वत:ला अॅडजस्ट करू शकत नाही. मी गावखेड्याचा आहे. तिथलाच राहणार. तिथेच मला चांगलं वाटतं. मला माझं बालपणच परत मिळालंय असं मला वाटतं. तिथलं आयुष्य खूप भारी आहे. प्रचंड शांतता मिळते तिथे. मी तुम्हाला खरंच सांगतोय, असं नाना पाटेकर म्हणाले होते.

अन् अमिताभ अवघडले

त्यावर अमिताभ यांनी परत सवाल केला. गावात तुमचा दिवस कसा जातो? तुमचे फोटो पाहिले. तुम्ही तिथे खूप साधं आयुष्य जगत असल्याचं दिसतं. मलाही वाटतं मी ते करावं. गावाकडे येऊन राहावं. पण कदाचित ते शक्य नाही, असं अमिताभ म्हणाले. त्यावर नानांनी अमिताभ यांना गावाकडे जाण्याची गळच घातली. अमितजी, तुमच्या मनाला गावाकडे जावं असं वाटतं ना? मग मनाचं ऐका. तुम्ही खरंच गावाकडे जा, असं नानांनी म्हणताच अमिताभ यांनाही अवघडल्यासारखं झालं. बिग बी विचारात पडले. नंतर नानांकडे आश्चर्याने पाहत हसू लागले.

दोघांचा ‘कोहराम’….

अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर ही दोन्ही बॉलिवूडमधील पॉप्युलर नावे आहेत. दोघांनीही प्रचंड ताकदीचे सिनेमे केले. पण दोघांनी फक्त एकच सिनेमा सोबत केला. मेहुल कुमार यांचा ‘कोहराम’. दोघांना एकत्र आणण्याचं काम मेहुल कुमार यांनी केलं होतं. या सिनेमात तब्बू, जया प्रदा आणि डॅनी आदी कलाकर होते. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us