नसीरुद्दीन शाह ‘ओनोमेटोमॅनिया’ने त्रस्त; झोपेतही त्यांना मिळत नाही आराम

| Updated on: Mar 07, 2022 | 5:38 PM

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी ओनोमेटोमॅनियाने (Onomatomania) ग्रस्त असल्याचा खुलासा केला. ओनोमेटोमॅनियामुळे व्यक्ती एखादा विशिष्ट शब्द किंवा वाक्य सतत बोलत असते. यामुळे शांत झोपही लागत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नसीरुद्दीन शाह ओनोमेटोमॅनियाने त्रस्त; झोपेतही त्यांना मिळत नाही आराम
Naseeruddin Shah
Image Credit source: Tv9
Follow us on

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी ओनोमेटोमॅनियाने (Onomatomania) ग्रस्त असल्याचा खुलासा केला. ओनोमेटोमॅनियामुळे व्यक्ती एखादा विशिष्ट शब्द किंवा वाक्य सतत बोलत असते. यामुळे शांत झोपही लागत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका युट्यूब चॅनलशी बोलताना त्यांनी याबद्दल सांगितलं. “मला ओनोमेटोमॅनिया हा आजार आहे. मी मस्करी करत नाहीये. याबद्दल तुम्ही डिक्शनरीमध्ये तपासू शकता. या आजारामुळे तुम्ही विनाकारण एखादा शब्द, वाक्य, श्लोक किंवा भाषण पुन्हा पुन्हा उच्चारत राहता. मी संपूर्ण वेळ हेच करत असतो. त्यामुळे मला झोपेतही आराम मिळत नाही. मी झोपेत असतानाही, मला आवडणारी वाक्य बडबडत असतो,” असं ते म्हणाले.

ओनोमेटोमॅनिया म्हणजे काय?

ओनोमेटोमॅनिया असलेले लोक विशिष्ट शब्दांचा सतत उच्चार करतात. दिल्लीतील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. पारुल अदलाखा यांच्या मते, “ओनोमॅटोमॅनिया ही एक अशी अवस्था आहे जिथे व्यक्ती विशिष्ट शब्द, वाक्य, ओळ सतत बडबडत असते. अनेकदा एखादा विशिष्ट शब्द किंवा वाक्य आठवत नसेल तर त्यामुळेही ते वारंवार त्याबद्दल विचार करत असतात.”

ओनोमेटोमॅनिया हा मानसिक आजार आहे का?

फोर्टिस हेल्थकेअरचे मानसिक आरोग्य आणि बिहेविअरल सायन्सेसचे संचालक डॉ समीर पारीख असं सांगतात, “ही मानसिक अवस्था नाही. याला आजारही म्हणू शकत नाही. कारण एखादा आजार तेव्हाच होतो जेव्हा त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, साहित्यात रस असलेल्यांना जी भाषा आवडते, जे संगीत आवडतं, त्याबद्दलचे विचार त्यांच्या मनात सतत येत असतात. यापलीकडे ओनोमेटोमॅनिया काही नाही. त्यामुळे याला मानसिक आजार म्हणणे अजिबात योग्य नाही.”

ओनोमॅटोमॅनियाचा एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो का आणि ते ओळखण्यासाठी काही विशिष्ट लक्षणं आहेत का, यावर डॉ. समीर पारीख पुढे म्हणतात, “नाही, दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होणं जवळजवळ अशक्य आहे, कारण आम्ही अशी कोणतीही उदाहरणं किंवा केसेस पाहिले नाहीत. परंतु जर असं असेल, तर कदाचित त्यात इतरही गुंतागुंत असू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला ओनोमेटोमॅनिया आहे आणि तुमच्या मनात इतरही विचार सतत घोळत असतील, तर ही पूर्ण वेगळी केस असेल.”

डॉ पारीख यांनी यातून असा निष्कर्ष काढला की, “ऑनोमॅटोमॅनिया हा एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतं की नाही हे आम्हाला माहित नाही. भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या वेगवेगळ्या लोकांच्या विचारप्रक्रिया भिन्न असू शकतात. जर एखाद्याचा कल साहित्याच्या विचार प्रक्रियेकडे असेल तर तो त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. त्यामुळे, जर ते चिंतेचं कारण बनत असेल तर ते चिंतेचं कारण का आहे हे शोधून काढलं पाहिजे.”

नसीरुद्दीन शाह हे त्याच्या पिढीतील सर्वात हुशार अभिनेते मानले जातात. एवढंच नाही तर, ते अजूनही चित्रपट विश्वात सक्रिय असून, मोठ्या स्टार्सना तगडी स्पर्धा देतात. मनोरंजन विश्वातील त्यांच्या योगदानाबद्दल नसीरुद्दीन शाह यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 2020 मध्ये ते ‘बंदिश बॅन्डिट्स’मध्ये झळकले होते. त्याशिवाय नसीरुद्दीन या वर्षाच्या सुरुवातीला ‘रामप्रसाद की तेरहवी’ या चित्रपटात देखील काम केलं होतं.

हेही वाचा: 

नागराज मंजुळेंची ती कविता ज्यात ‘झुंड’ची बीजं आहेत, किरण मानेंकडून ‘लब्यू भावा’ची पोस्ट

‘एक सणाचं गाणं’, झुंडमधल्या आंबेडकर जयंतीच्या गाण्यावर गणेश मतकरींचं वक्तव्य, वाचा चर्चेतल्या पोस्टमधले 5 मोठे मुद्दे