
बॉलिवूड असो किंवा मग साउथ इंडस्ट्री असो आपण अनेक कलाकारांच्या संघर्षाबद्दल ऐकलं आहे. अनेक अभिनेत्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं. असाच एक अभिनेता आहे ज्याने फक्त करिअरसाठी संघर्ष नाही केला तर शारिरीक व्याधींवर मातही मिळवली आणि आज तो एक यशस्वी अभिनेता आहे. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट त्याने दिले आहेत. तुम्हाला जाणून हे आश्चर्य वाटेल की या अभिनेत्याची एकच किडनी चांगलं काम करतेय आणि त्याला एकाच डोळ्याने नीट दिसतं. तरीही तो आज एक सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक आहे.
एकच डोळा अन् एकच किडनी
हा अभिनेता म्हणजे ‘बाहुबली’ चित्रपटातून आपल्या खलनायकाच्या भूमिकेनं सर्वांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता राणा दग्गुबती. होय, राणा दग्गुबतीची चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख आहे. खलनायक भल्लालदेवाची भूमिका साकारून त्याने लोकांवर खोलवर छाप सोडली. पण पडद्यावर शक्तिशाली दिसणाऱ्या या अभिनेत्याची खरी जीवनकथा त्यापेक्षा खूपच कठीण आणि प्रेरणादायी आहे.
राणा सध्या त्याच्या ओटीटी सीरिज ‘राणा नायडू 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ही सीरिज 13 जूनपासून नेटफ्लिक्सवर आली आहे. परंतु या प्रमोशनल काळात त्याने एका मुलाखतीत त्याच्या आरोग्याशी संबंधित काही गोष्टी देखील शेअर केल्या आहेत, ज्या कोणालाही आश्चर्यचकित करू शकतात.
मी एका डोळ्याने पाहू शकत नाही…
राणा दग्गुबातीने एका मुलाखतीत सांगितले की तो त्याच्या एका डोळ्याने पाहू शकत नाही. तो गमतीने म्हणाला, “आता हे कॉमेडी वाटू शकतं पण जेव्हा मी अॅक्शन सीन करतो तेव्हा मला खूप अडचणी येतात शूटिंग दरम्यान धुळीत राहणे किंवा लेन्सशिवाय राहणे माझ्यासाठी कठीण होते” पण असे असूनही, त्याने कधीही ही त्याची कमजोरी बनू दिली नाही.
अल्लू अर्जुनसोबतचा मजेदार किस्सा
राणाने एक मजेदार किस्साही सांगितला. एके दिवशी अल्लू अर्जुनने त्याच्याकडे बराच वेळ पाहत होता नंतर त्याने राणाला विचारले ‘तू रडतोयस का?’ राणाने त्यावर उत्तर देत सांगितले की ‘नाही मित्रा, माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येत आहे. मला उजव्या डोळ्याने दिसत नाही”
किडनी ट्रांसप्लांटनंतर आयुष्यच बदललं.
राणाने असेही सांगितले की त्याचे कॉर्निया आणि किडनी ट्रांसप्लांट झाले आहे. त्यावरही तो गमतीनेच म्हणाला की, ‘आता माझ्याकडे एक डोळा आहे, एक किडनी आहे, बऱ्याच गोष्टी ट्रांसप्लांट झाल्या आहेत… मी आता टर्मिनेटरसारखा झालोय’
मी या सगळ्या व्याधींमुळे डगमगलो नाही
राणा म्हणतो की बरेच लोक त्यांच्या शारीरिक समस्या लपवतात आणि निराश होतात, परंतु त्याने ती समस्या स्वीकारली आणि एक नवीन ओळख निर्माण केली. त्याने हे सिद्ध केले की खरा नायक तो असतो जो पडद्यामागे राहूनही लढतो स्वतःशी, परिस्थितीशी देखील. आज राणा हा केवळ एक अभिनेता नाही तर लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्याने स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सर्वांसमोर आणलं आहे. एवढंच नाही तर त्याच्या आजारपणातही आपण कशापद्धतीने धैर्याने जगायला हवं हेही त्याने शिकवलं.