तो परत आला? तोच चेहरा… तेच हास्य आणि तेच डोळे… हुबेहुब सुशांत सिंह राजपूत… पाहताच नेटकरी म्हणाले…
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसारखाच हुबेहूब दिसणारा एक तरुण, अयान, सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याचे व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले आहेत, अनेकांना सुशांतच परत आल्याचा क्षणभर भास होत आहे.

जगात एक सारखी दिसणारी सात माणसे असतात असं म्हटलं जातं. पण काही लोक तर एकमेकांसारखे इतके दिसतात की त्यांना ओळखणंही मुश्कील जातं. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत सारखाच दिसणारा एक तरुण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अगदी सुशांत सिंह राजपूतची झेरॉक्स कॉपी म्हणता येईल इतका तो हुबेहुब दिसतो. त्याला पाहिल्यावर नेटकरीही आश्चर्यचकीत झाले. काहींना तर सुशांतच परत आल्याचा क्षणभर भास झाला. इतका हा तरुण हुबेहुब सुशांत सारखा दिसत आहे. सध्या या तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आला.
सुशांत सिंह राजपूत हा बॉलिवूडमधील एक चमकता तारा होता. त्याने टीव्हीपासून अभिनयाला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये आऊटसाईडर असूनही त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. पवित्र रिश्ता या मालिकेत त्याने मानवची भूमिका साकारली होती. त्यामुळे तो घराघरात पोहोचला होता. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्याने काइ पो छे, एमएस धोनी अनटोल्ड स्टोरी, छिछोरे आदी सिनेमात काम करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण 14 जून 2020 रोजी त्याचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुशांतला जाऊन सहा वर्ष झाली. पण आजही त्याचे चाहते त्याची आठवण काढतात. त्यातच आता सुशांतच्या सारख्या दिसणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
ही तर झेरॉक्स कॉपी
इन्स्टाग्रामवर सुशांतच्या ड्युप्लिकेटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याची हेअरस्टाईल, स्माईल, डोळे सेम सुशांत सारखेच आहेत. या मुलाचं नाव अयान आहे. सोशल मीडियावर तो नेहमीच त्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. 295 के फॉलोअर्स त्याला फॉलो करतात.
इन्स्टावर अयानचा नवा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी त्यावर प्रचंड कमेंट केल्या आहेत. या तरुणाला सुशांतच्या कुटुंबियाला नक्कीच भेटवलं पाहिजे, असं काहीजण म्हणत आहेत. तर एकाने वेलकम बॅक सुशांत सर… असं लिहिलं आहे. आणखी एकाने जस्ट लाइक सुशांत सर, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काहींनी तर अयान म्हणजे सुशांतची झेरॉक्स कॉपी असल्याचं म्हटलं आहे.