Ajay Devgn | ‘थँक गॉड’ चित्रपटाच्या निर्मात्यांचे एक पाऊल मागे, वाद शांत होणार?

थँक गॉड चित्रपटाविरोधात सुरू असलेला वाद कमी करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय.

Ajay Devgn | थँक गॉड चित्रपटाच्या निर्मात्यांचे एक पाऊल मागे, वाद शांत होणार?
| Updated on: Oct 21, 2022 | 1:13 PM

मुंबई : बॉलिवूडचे (Bollywood) चित्रपट आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ओम राऊत यांचा आदिपुरूष चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतानाच अजय देवगणचा थँक गॉड हा चित्रपट देखील वादात सापडलाय. थँक गॉड चित्रपटाचे (Movie) प्रकरण तर थेट न्यायालयातच गेल्याने चित्रपट निर्मात्यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने थँक गॉड चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा देत महत्वाचा निर्णय घेतलाय. थँक गॉड (Thank God) चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने सुरू आहे.

थँक गॉड चित्रपटाविरोधात सुरू असलेला वाद कमी करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. इतकेच नाही तर लोकांचा रोष कमी करण्यासाठी चित्रपटात महत्वाचे तीन बदल देखील करण्यात येणार असल्याची माहिती मिळतंय. न्यायालयात चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलासा मिळूनही निर्माते चित्रपटात बदल करणार आहेत.

थँक गॉड चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा वाद सुरू झालाय. मध्य प्रदेशमध्ये चित्रपटाच्या निर्मात्यांच्या विरोधात गुन्हाही नोंद करण्यात आला असून अजय देवगणवरही गुन्हा नोंद झालाय. सोशल मीडियावरही चित्रपटा विरोधात लोकांचा रोष वाढताना दिसत असल्याने निर्माते चित्रपटात मुख्य तीन बदल करणार आहेत.

अजय देवगण थँक गॉड चित्रपटात चित्रगुप्ताच्या भूमिकेत आहे. मात्र, अजयचे हे पात्र लोकांच्या पचनी पडले नसल्याचे दिसत आहे. माहितीनुसार, संपूर्ण चित्रपटात अजय देवगणला सीजी नावाने बोलले जाणार आहे. हनुमानाच्या मूर्तीला मिठाई अर्पण करतानाचा सीन बदलला जाणार आहे. इतकेच नाही तर डिस्क्लेमरची वेळ वाढवण्यात आली आहे. यामुळे आता थँक गॉड चित्रपटाचा वाद शांत होण्याची शक्यता आहे.