Yo Yo Honey Singh: रॅपर हनी सिंगचा पत्नीला घटस्फोट; पोटगीची रक्कम कोट्यवधीत

हनी सिंगने मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळ केल्याचा आरोप शालिनीने केला. विवाहबाह्य संबंध, इतरांसमोर लग्नाला मान्यता न देणं आणि सासऱ्यांकडून लैंगिक छळासारखे गंभीर आरोपही तिने केले आहेत.

Yo Yo Honey Singh: रॅपर हनी सिंगचा पत्नीला घटस्फोट; पोटगीची रक्कम कोट्यवधीत
Yo Yo Honey Singh: रॅपर हनी सिंगचा पत्नीला घटस्फोट
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 09, 2022 | 6:45 PM

प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याने पत्नी शालिनी तलवारला (Shalini Talwar) घटस्फोट दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हनी सिंगने घटस्फोटानंतर शालिनीला पोटगी (alimony) म्हणून एक कोटी रुपये दिल्याचं कळतंय. 8 सप्टेंबर रोजी हनी सिंग आणि शालिनी दिल्लीच्या साकेत कोर्टात घटस्फोटासाठी पोहोचले होते. यावेळी हनी सिंगने न्यायाधीश विनोद कुमार यांच्या उपस्थितीत शालिनीला एक कोटी रुपयांचा चेक दिला. शालिनीने हनी सिंग आणि त्याच्या पालकांच्या विरोधात 118 पानी याचिका दाखल केली होती. या याचिकेत तिने त्यांच्यावर बरेच आरोप केले होते.

हनी सिंगने मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळ केल्याचा आरोप शालिनीने केला. विवाहबाह्य संबंध, इतरांसमोर लग्नाला मान्यता न देणं आणि सासऱ्यांकडून लैंगिक छळासारखे गंभीर आरोपही तिने केले आहेत.

हनी सिंगनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित शालिनीच्या आरोपांना उत्तर दिलं होतं. शालिनीने केलेले सर्व आरोप त्याने या पोस्टमधून फेटाळले होते. “मी गेल्या 15 वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करतोय. देशभरातील अनेक कलाकारांसोबत मी काम केलंय. सर्वांना माझ्या पत्नीबद्दल ठाऊक होतं. माझ्या शूट्सना, इव्हेंट्सना आणि मिटींगलाही तिची हजेरी असायची. मी तिचे सर्व आरोप फेटाळतो”, असं त्याने लिहिलं होतं.

यो यो हनी सिंगचं खरं नाव हर्देश सिंह आहे. मूळचा पंजाबचा असलेला हर्देश ‘कॉकटेल’ चित्रपटानंतर यो यो हनी सिंह या नावाने खूप प्रसिद्ध झाला. त्याने चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘अंग्रेजी बीट’ या गाण्याला आपला आवाज दिला. हे गाणं प्रचंड हिट झालं होतं. 2011 मध्ये हे गाणं सर्वात प्रसिद्ध गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानावर होतं.

2014 मध्ये ‘इंडियाज रॉकस्टार’ या शोच्या माध्यमातून पहिल्यांदा हनी सिंगने आपली पत्नी शालिनी हिची सर्वांशी ओळख करून दिली होती. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं होतं, कारण बऱ्याच लोकांना हनी सिंग विवाहित आहे हे माहितही नव्हतं.