बॉम्बे म्हणायचं की मुंबई? अभिनेता सिद्धार्थ जाधवने एका वाक्यात संपवला विषय, रोखठोकच म्हणाला…

Bombay or Mumbai : अभिनेता सिद्धार्थ जाधवचा 'नटसम्राट बालगंधर्व कला रत्न' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यावेळी त्याने मुंबईला मुंबई म्हणायचे की बॉम्बे म्हणायचे यावर भाष्य केले आहे.

बॉम्बे म्हणायचं की मुंबई? अभिनेता सिद्धार्थ जाधवने एका वाक्यात संपवला विषय, रोखठोकच म्हणाला...
Siddharth Jadhav
Image Credit source: Google
Updated on: Nov 28, 2025 | 10:34 PM

Siddharth Jadhav : प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘नटसम्राट बालगंधर्व कला रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. सिद्धार्थ जाधवच्या कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याला हा पुरस्कार ‘साईदिच्छा प्रतिष्ठान’ आयोजित 25 व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम आज यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई येथे पार पडला. यावेळी बॉम्बे म्हणायचं की मुंबई? यावर बोलताना सिद्धार्थने एका वाक्यात उत्तर दिले आहे. तो काय म्हणाला ते जाणून घेऊयात.

पुरस्कार स्वीकारताना आनंद झाला

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला की, ‘मी माझ्या मुलीसोबत इथे आलो आहे. तिच्या सोबत हा पुरस्कार स्वीकारून मला खूप आनंद झाला आहे. 2009 ला मला युवा बालगंधर्व कडून पुरस्कार मिळाला होता. मी 2000 साली माझ्या कारकि‍र्दीची सुरुवात केली होती. आज पंचवीस वर्षे झाली मी मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करतोय. त्यामुळे हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे. हा पुरस्कार मिळने ही खूप मोठी गोष्ट आहे.’

‘आज मोठ्या दिग्गजांच्या समोर पुरस्कार स्वीकारण्याचा योग आला, मला चांगलं वाटलं. हे पुरस्कार पुढे काहीतरी करण्याची ताकद देतात. मालिका ते सिनेमा पर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि उभे राहण्याची ताकद हे नाटकांनी आम्हाला दिला. चेहरा नसलेल्या कलाकारांना रंगभूमीने चेहरा दिला’ असंही तो म्हणाला.

मुंबई की बॉम्बे?

मुंबईला मुंबई म्हणायचे की बॉम्बे म्हणायचे यावरून अनेकदा वाद होतो. यावर बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, ‘मुंबईला मी मुंबई म्हणणार, मी मुंबईत राहतो आणि मी मुंबईच बोलणार.’ प्रदूषणाच्या प्रश्नावर बोलताना तो म्हणाला की, प्रदूषणासह महाराष्ट्रात आणखी काही प्रश्न आहेत. मी व्यसनमुक्तीचा ब्रँड अँबेसिटर आहे. युवक मोठ्या प्रमाणात व्यसन करतात आणि ते कमी झालं पाहिजे.

अनेक मान्यवर उपस्थित

या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, अभिनेते मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, गायक कुमार सानू, सोनू निगम, आमदार मैथिली ठाकूर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री भरतशेठ गोगावले, दत्तात्रय भरणे, प्रताप सरनाईक, आमदार धनंजय गाडगीळ, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक कवी, अभिनेते आणि राजकीय नेते उपस्थित होते.