
सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका असलेला ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 23 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सोमवारी या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आणि अवघ्या 48 तासांत या प्री-सेलचा विक्रम रचला गेला. सनी देओलच्या याआधीच्या ‘जाट’च्या एकूण ॲडव्हान्स बुकिंगलाही ‘बॉर्डर 2’ने मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे तर ‘धुरंधर’ आणि ‘वॉर 2’ यांसारख्या चित्रपटांवरही ‘बॉर्डर 2’ने मात दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आणखी चांगली बॉक्स ऑफिस कलेक्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतात सोमवारपासून ‘बॉर्डर 2’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात करण्यात आली होती. देशभक्तीपर कथेवर आधारित या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून थिएटरमध्ये गर्दी होणार असल्याचं दिसून येत आहे. ऐनवेळी तिकिट मिळवण्यात गोंधळ उडू नये म्हणून सोमवारपासूनच प्रेक्षकांनी ॲडव्हान्स तिकिट बुकिंग करायला सुरुवात केली. पाहता पाहता ‘बॉर्डर 2’च्या प्री-तिकिट सेलने रेकॉर्डच केला. त्यामुळे प्रदर्शनाआधीच सनी देओलच्या या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बॉर्डर 2’च्या हिंदी 2D फॉरमॅटची आतापर्यंत 1 लाख 2 हजार 750 तिकिटांची विक्री झाली आहे. यासोबतच विना ब्लॉक खुर्च्यांच्या प्री-तिकिट सेलमध्ये आतापर्यंत 3.29 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तर ब्लॉक खुर्च्यांसोबत या ॲडव्हान्स बुकिंगद्वारे 6.53 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात आला आहे. सनी देओलच्या ‘जाट’ या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगद्वारे 2.4 कोटी रुपयांची कमाई केली होती. असं असलं तरी ‘बॉर्डर 2’ने अद्याप ‘गदर 2’चा विक्रम मोडलेला नाही. सनी देओल आणि अमीषा पटेलच्या या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 17.60 कोटी रुपये कमावले होते. परंतु ‘बॉर्डर 2’कडे आज आणि उद्याचा दिवस असल्याने प्री-तिकिट सेलमधून आणखी चांगली कमाई होऊ शकते.
‘बॉर्डर 2’ हा जे. पी. दत्ता यांच्या 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. अनुराग सिंहने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत.