
सनी देओलचा बहुचर्चित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अवघ्या चार ते पाच दिवसांत हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. ओपनिंग वीकेंडला 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई झाली आहे. त्यामुळे ‘बॉर्डर’प्रमाणेच त्याचा सीक्वेल ‘बॉर्डर 2’सुद्धा लोकप्रिय ठरतोय. चित्रपटाचं हेच यश पाहता आता निर्मात्यांनी सनी देओलच्या चाहत्यांना खुश करणारी बातमी जाहीर केली आहे. ‘बॉर्डर 2’नंतर ‘बॉर्डर 3’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते भूषण कुमार यांनी यावर शिक्कामोर्तब केला आहे. ‘बॉर्डर 3’ला निर्मात्यांकडून हिरवा कंदील मिळाला असून त्याचं दिग्दर्शन ‘बॉर्डर 2’चेच दिग्दर्शक अनुराग सिंह करणार आहेत.
एका मुलाखतीत भूषण कुमारने अनुरागसोबतच्या आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती दिली. यावेळी तो म्हणाला, “आम्ही त्यांच्या कंपनीसोबत एक जॉइंट वेंचर (एक वेगळा चित्रपट) करतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुरागच करणार असून हे काहीतरी नवीन असेल. बॉर्डर 3 सुद्धा योग्य वेळी बनणार आहे.” भूषण कुमारने या मुलाखतीत पुन्हा एकदा ‘बॉर्डर 3’वर शिक्कामोर्तब केला. “अर्थातच, ही इतकी मोठी फ्रँचाइजी आहे. अनुरागने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्ही तब्बल 30 वर्षांनंतर एखाद्या गोष्टीला परत आणत असाल आणि त्याला इतकं प्रेम मिळत असेल, तर निश्चितच आम्ही त्याला पुढे नेऊ”, असा पुनरुच्चार त्याने केला.
बॉक्स ऑफिसवर सध्या ‘बॉर्डर 2’ची जबरदस्त कमाई सुरू आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित या सीक्वेलमध्ये अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेतआ हे. त्याच्यासोबत वरुण धवन, दिलजित दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. टी-सीरिज आणि जेपी फिल्म्सने मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रेक्षक-समीक्षकांकडून ‘बॉर्डर 2’ला दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 180 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यापैकी सर्वाधिक कमाई प्रजासत्ताक दिनी झाली. या एका दिवसात ‘बॉर्डर 2’ने तब्बल 59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 200 कोटींच्या पार गेला आहे. जगभरात ‘बॉर्डर 2’ने 239.4 कोटी रुपये कमावले आहेत.
‘बॉर्डर 2’ हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांत सनी देओलच्या करिअरमधील दुसरा सर्वांत मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘जाट’ (90.34 कोटी रुपये) आणि ‘गदर: एक प्रेम कथा’ (76.88 कोटी रुपये) यांच्याही कलेक्शनला मागे टाकलं आहे.