Border 2 : ‘बॉर्डर 2’ ठरतोय खरा ‘धुरंधर’; अवघ्या 3 दिवसांत बनवले 5 तगडे रेकॉर्ड्स
सनी देओलच्या 'बॉर्डर 2'ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी जबरदस्त कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही नवे विक्रमसुद्धा रचले आहेत. 'बॉर्डर 2'ने अवघ्या तीन दिवसांत मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बॉर्डर 2’ची बॉक्स ऑफिसवर धुआंधार कमाई सुरू आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. ओपनिंग वीकेंडलाच ‘बॉर्डर 2’ने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. जे. पी. दत्ता यांच्या 1997 मधील ‘बॉर्डर’चा हा सीक्वेल आहे. या चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळतोय. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला आणखी फायदा होणार आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शन ट्रॅकिंग पोर्टल ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बॉर्डर 2’ने तिसऱ्या दिवशी तब्बल 54.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवसाचे 30 कोटी आणि दुसऱ्या दिवसाचे 36.5 कोटी यांपेक्षा तिसऱ्या दिवसाचा हा आकडा अधिक आहे. यासह या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 121 कोटी रुपये कमावले आहेत.
- ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांत सनी देओलच्या करिअरमधील दुसरा सर्वांत मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘जाट’ (90.34 कोटी रुपये) आणि ‘गदर: एक प्रेम कथा’ (76.88 कोटी रुपये) यांच्याही कलेक्शनला मागे टाकलं आहे.
- ‘बॉर्डर 2’ने तीन दिवसांत वरुण धवनच्या सहा बॉलिवूड चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. यामध्ये हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, सुई धागा, जुगजुग जियो, कलंक, एबीसीडी 2 आणि बद्रीनाथ की दुल्हनियाँ यांचा समावेश आहे. यासोबतच ‘बॉर्डर 2’ हा वरुणच्या करिअरमधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
- ‘बॉर्डर 2’ने 2025 मधल्या 8 चित्रपटांच्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनला मात दिली आहे. यामध्ये ‘धुरंधर’ (106.5 कोटी रुपये), ‘थामा’ (103.5 कोटी रुपये), ‘हाऊसफुल 5’ (91.83 कोटी रुपये), ‘सिकंदर’ (86.44 कोटी रुपये) आणि ‘सैयारा’ (84.45 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
- ‘बॉर्डर 2’ हा ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडमधील 18 वा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आमिर खानच्या ‘दंगल’सह इतर अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे.
- ‘बॉर्डर 2’ने 6 ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या तिसऱ्या दिवसाच्या रेकॉर्डलाही धूळ चारली आहे. यामध्ये ‘दंगल’ (42.41 कोटी रुपये), ‘बाहुबली 2’ (46.5 कोटी रुपये), ‘धुरंधर’ (43 कोटी रुपये), RRR (31.5 कोटी रुपये), ‘केजीएफ 2’ (42.9 कोटी रुपये) आणि ‘गदर 2’ (51.7 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
