Alia Bhatt: आमिरनंतर आता आलिया भट्टच्या चित्रपटाविरोधात ‘बॉयकॉट’चा ट्रेंड; नेमका का होतोय विरोध?

एखाद्या विषयावर किंवा भूमिकेवर नेटकऱ्यांना आक्षेप असल्यास अनेकदा हल्ली सोशल मीडियावर 'बॉयकॉट'चा ट्रेंड पहायला मिळतो. नेटकऱ्यांनी आता आलियाच्या या चित्रपटातील कथानकावर आक्षेप घेतला आहे.

Alia Bhatt: आमिरनंतर आता आलिया भट्टच्या चित्रपटाविरोधात बॉयकॉटचा ट्रेंड; नेमका का होतोय विरोध?
Darlings
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 04, 2022 | 10:07 AM

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘डार्लिंग्स’ (Darlings) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलियासोबत शेफाली शाह, विजय वर्मा, रोशन मॅथ्यू यांच्या भूमिका आहेत. आलिया यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेली बद्रुनिस्सा शेख साकारतेय. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर #BoycottAliaBhatt हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. एखाद्या विषयावर किंवा भूमिकेवर नेटकऱ्यांना आक्षेप असल्यास अनेकदा हल्ली सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’चा ट्रेंड पहायला मिळतो. नेटकऱ्यांनी आता आलियाच्या या चित्रपटातील कथानकावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटातून आलिया ही पुरुषांवरील कौटुंबिक हिंसाचाराला (domestic violence) प्रेरणा देत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

या चित्रपटात अभिनेता विजय हा बद्रुनिस्साचा पती हमजा शेखची भूमिका साकारतोय. हमजा तिच्या पत्नीवर कौटुंबिक अत्याचार करतो आणि त्याचाच सूड घेण्यासाठी बद्रु त्याचं अपहरण करते आणि राहत्याच घरी त्याला त्रास देते. चित्रपटाच्या टीझरमध्ये आलिया तिच्या पतीला तव्याने मारताना, त्याच्या तोंडावर पाणी फेकताना, त्याचं तोंड पाण्याच्या टाकीत बुडवताना दिसतेय. पतीने तिला ज्या पद्धतीने वागवलं, त्याच पद्धतीने ती त्याच्याशी वागताना दिसते. याच दृश्यांवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटातून आलिया ही कौटुंबिक हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे.

आलिया ही भारतातील अँबर हर्ड आहे. भारतीय पुरुषांविरुद्ध ती कौटुंबिक हिंसाचाराला प्रेरणा देतेय, असं एका युजरने लिहिलं. तर महिला असो किंवा पुरुष, कौटुंबिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणं कधीही योग्य नाही, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय. आलिया भट्टच्या या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.