
सिनेसृष्टीत कायमच कास्टिंग काऊचबद्दल चर्चा होताना दिसते. बॉलिवूडसह हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत कास्टिंग काऊचबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. त्यातच आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री चाहत खन्नाने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कास्टिंग काऊचच्या अनुभवांबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कास्टिंग काऊच हे सर्रास केले जाते. काही वेळा तर करारातही याचा उल्लेख असतो, असे अभिनेत्री चाहत खन्नाने म्हटले.
चाहत खन्नाने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तसेच या मुलाखतीदरम्यान चाहत खन्नाने मी टू आणि कास्टिंग काऊचसारख्या संवेदनशील विषयांवर विचारण्यात आले. त्यावरही तिने स्पष्टपणे मत मांडले.
“मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळी लोक ‘अम्मा कॉम्प्रोमाइज’ असे बोलायचे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत हे सर्रास चालते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोक या गोष्टी उघडपणे बोलतात आणि पण ते महिलांचा तितकाच आदरही करतात. हे हिंदी सिनेसृष्टीतही घडते. फक्त इतकाच फरक असतो की दाक्षिणात्य सिनेसृष्टीत याबद्दल उघडपणे विचारले जाते आणि बॉलिवूडमध्ये वेगळ्या पद्धतीने याबद्दल विचारणा होते”, असे चाहत खन्ना म्हणाली.
“मी तर अशा लोकांना भेटले आहे, जे करारात स्पष्टपणे नमूद करतात की तुम्हाला चित्रपटातील अभिनेता, दिग्दर्शक या लोकांसोबत कॉम्प्रोमाइज करावे लागेल. फक्त स्पॉट दादासोडून यात सर्वांचा समावेश असतो.”, असे चाहत खन्नाने म्हटले.
दरम्यान चाहत खन्ना ही ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. ‘बडे अच्छे लगते है’, ‘शाका लाका बुम बुम’, ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’, ‘कबुल है’, ‘काजल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात ती झळकली. ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. तिने अनेक मालिका आणि चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मात्र तिला तितकी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली नाही. तिने दोन विवाह केले, परंतु दोन्ही यशस्वी झाले नाहीत. मात्र आता तिच्या या विधानानंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.