
मराठी चित्रपटसृष्टीत ‘दुसरे निळू फुले’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे चंदू पारखी. “माझी जागा कोणी घेईल, तर तो चंदू पारखीच असेल,” असे खुद्द निळू फुले यांनी एकदा म्हटले होते. अनोख्या अभिनय शैलीने, मनोरंजन आणि वास्तववादी अभिनयाच्या उत्तम मिश्रणाने त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
दूरदर्शनवरील ‘व्योमकेश बक्षी’, ‘अडोस पडोस’, ‘लाइफलाइन’, ‘जबान संभाल के’ यांसारख्या हिंदी मालिका आणि ‘राम जाने’, ‘अंगारे’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. मराठी चित्रपटांमध्ये ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘कळत नकळत’, ‘बाप रे बाप’, ‘बलिदान’, ‘वाजवा रे वाजवा’ यांतील त्यांच्या भूमिकांना विशेष दाद मिळाली. पण, चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? दागिन्यांसह दिला होता अग्नी
चंदू पारखी यांचे आयुष्य खडतर आणि आव्हानांनी भरलेले होते. इंदूर येथे जन्मलेल्या चंदू यांनी अभिनयातच करिअर घडवण्याचा निश्चय करून, फक्त शंभर-दोनशे रुपये खिशात घेऊन मुंबई गाठली. एवढ्या कमी पैशांत मुंबईसारख्या शहरात संघर्ष करणे म्हणजे जणू जुगार खेळण्यासारखे होते.
छोट्या-मोठ्या नाटकांमधून कामावले पैसे
मुंबईतील सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता. सुरुवातीला छोट्या-मोठ्या नाटकांमधील किरकोळ भूमिका करत त्यांनी दिवस काढले. कोणीतरी काम देईल या आशेने ते कधी नाट्यगृहात, तर कधी दूरदर्शनच्या कार्यालयात भटकत. काही वेळा तर त्यांच्याकडे पोट भरण्यासाठी पैसेही नसायचे. अशा वेळी ते लसणाच्या पाकळ्या खाऊन भूक शमवत.
लसणाच्या पाकळ्या खाण्याच्या सवयीमुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला. डॉक्टरांनी इंजेक्शनचा कोर्स सुचवला, पण पैशांची चणचण आणि आजारपणामुळे काम मिळणे कठीण होईल या भीतीने त्यांनी आजार अंगावर काढला.
विनय आपटेंनी केली मदत
एकदा दिग्दर्शक आणि अभिनेते विनय आपटे शिवाजी मंदिर नाट्यगृहात गेले असता, त्यांना चंदू पारखी भिंतीला टेकून खाली बसलेले दिसले. त्यांनी विचारले, “काय झाले?” तेव्हा चंदू म्हणाले, “काही नाही, थोडे चक्कर आले म्हणून बसलो.” तिथे उभ्या असलेल्या एका कामगाराने सांगितले की, चंदू तीन दिवसांपासून उपाशी होते. विनय आपटेंनी चंदू यांच्या हातात लसणाच्या पाकळ्या पाहिल्या आणि विचारले, “हे कशासाठी?” चंदू म्हणाले, “लसूण खाल्ल्याने भूक लागत नाही.” हे ऐकून विनय आपटे स्तब्ध झाले. त्यांनी तात्काळ चंदू यांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि काही ओळखीच्या निर्मात्यांमार्फत त्यांना तीन-चार नाटकांमध्ये काम मिळवून देऊन दोन हजार रुपये कमावून दिले.
पुढे चंदू यांनी आपला संघर्ष अखंडपणे सुरू ठेवला. हळूहळू त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. नाटके, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. मात्र, या हरहुन्नरी कलाकाराने १४ एप्रिल १९९७ रोजी या जगाचा निरोप घेतला.