‘छावा’ची होणार बंपर ओपनिंग, ॲडव्हान्स बुकिंगमध्येच कोट्यवधींची कमाई; मोडला ‘स्त्री 2’चा रेकॉर्ड

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाची पहिल्याच दिवशी बंपर कमाई होणार असल्याचं चित्र दिसतंय. यामागचं कारण म्हणजे चित्रपटाची होणार बंपर ॲडव्हान्स बुकिंग. येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

छावाची होणार बंपर ओपनिंग, ॲडव्हान्स बुकिंगमध्येच कोट्यवधींची कमाई; मोडला स्त्री 2चा रेकॉर्ड
छावा
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 11, 2025 | 10:17 AM

अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं असून गेल्या काही दिवसांपासून त्याचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी 8 फेब्रुवारीपासूनच तिकिटांची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. चित्रपटाविषयी असलेल्या उत्सुकतेमुळे अवघ्या काही तासांतच ॲडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. यातूनच चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी तगडी कमाई केली आहे. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत देशभरात ‘छावा’चे 1 लाख 48 हजार 761 तिकिटं विकली गेली आहेत.

  • ‘छावा’ची हिंदी भाषेतील 2डी व्हर्जनमधील 1 लाख 45 हजार 170 तिकिटं प्री-सेलमध्ये विकली गेली.
  • हिंदी IMX 2डी व्हर्जनमध्ये ‘छावा’चे 2 हजार 628 तिकिटं विकली गेली आहेत.
  • हिंदी फोरडीएक्स व्हर्जनमध्ये 679 तिकिटांची ॲडव्हान्स बुकिंग झाली.
  • हिंदी ICE मध्ये 284 तिकिटं प्री-सेलमध्ये विकली गेली.

प्रदर्शनापूर्वीच या बहुचर्चित चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून आतापर्यंत 4.24 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ब्लॉक सीट्ससह ‘छावा’ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 5.41 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत विकी कौशलच्या या चित्रपटाने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’लाही मागे टाकलंय. प्रदर्शनाच्या चार दिवस आधी ‘स्त्री 2’च्या तिकिटांची विक्री ही विकी कौशलच्या चित्रपटापेक्षा बरीच कमी झाली होती. ‘बुक माय शो’नुसार ‘छावा’ची प्री-तिकिट सेल ही ‘स्त्री 2’पेक्षा 103 टक्क्यांनी जास्त आहे.

प्रदर्शनाच्या चार दिवसांपूर्वी चित्रपटांची ॲडव्हान्स बुकिंग

  1. जवान- 4 लाख 34 हजार
  2. टायगर 3- 2 लाख 25 हजार
  3. ॲनिमल- 1 लाख 90 हजार
  4. छावा- 1 लाख 3 हजार
  5. स्त्री 2- 47 हजार

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने बरीच मेहनत घेतली आहे. यासाठी त्याने 25 किलो वजन वाढवलं, काठी चालवणं, तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना ही येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अक्षय खन्ना हा औरंगजेबाच्या भूमिकेत आहे.