Chhaava: ‘छावा’ पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; राज्य सरकारचा चांगला निर्णय

विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट थिएटरमध्ये बघण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Chhaava: छावा पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; राज्य सरकारचा चांगला निर्णय
Vicky and Rashmika in Chhaava
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 20, 2025 | 10:01 AM

‘छावा’ या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा पुन्हा एकदा पोहोचवली जात आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. म्हणूनच अगदी पहिल्या शोपासून थिएटरमध्ये ‘छावा’ बघण्यासाठी गर्दी जमली आहे. अशातच हा चित्रपट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशातील एका राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री (करमुक्त) करण्यात आला आहे. त्यामुळे या राज्यातील प्रेक्षकांना ‘छावा’च्या तिकिटावर आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत.

‘छावा’ला टॅक्स फ्री करणारं हे राज्य मध्यप्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ‘छावा’ हा चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बनलेल्या ‘छावा’ या चित्रपटाला मी टॅक्स फ्री करण्याची घोषणा करतो,’ असं ते म्हणाले. याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाला राज्यात करमुक्त करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती.

“मला आनंद आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर अत्यंत चांगला चित्रपट बनवला गेला आहे. मी अजून हा चित्रपट पाहिला नाही. मात्र मी लोकांकडून ऐकलंय की इतिहासाशी छेडछाड न करता हा चित्रपट बनवला गेला आहे. या चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काय करू शकतो, याबद्दल आम्ही विचार करू”, असं फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 2017 च्या आधीच मनोरंजन कर हटवल्याचं त्यांनी सांगितलं. ‘छावा’ या चित्रपटाने गेल्या सहा दिवसांत 197.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट लवकरच कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.