Prasad Oak: प्रसाद ओक म्हणजे ‘धर्मवीर आनंद दिघे’! फडणवीसांच्या कौतुकानंतर अभिनेता नतमस्तक

Prasad Oak: प्रसाद ओकचा हा सन्मान केवळ एका पुरस्कारापुरता मर्यादित नसून त्याच्या प्रदीर्घ कलाप्रवासाची पोचपावती मानली जात आहे. अभिनेता म्हणून त्याने विनोदी, गंभीर, ऐतिहासिक आणि चरित्रात्मक अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

Prasad Oak: प्रसाद ओक म्हणजे ‘धर्मवीर आनंद दिघे’! फडणवीसांच्या कौतुकानंतर अभिनेता नतमस्तक
प्रसाद ओक, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 10, 2026 | 11:50 AM

मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता, दिग्दर्शक आणि परीक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रसाद ओकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रसाद ओकला ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कार स्वीकारताना त्याच्या कलाप्रवासाचं आणि विशेषतः ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून कौतुक केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद ओकच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना तो अभिनयासोबत दिग्दर्शन आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळत असल्याचं सांगितलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील त्याची परीक्षक म्हणून असलेली भूमिकाही त्यांनी विशेष अधोरेखित केली.

प्रसाद ओकच्या अभिनय कारकिर्दीतील आनंद दिघे यांची भूमिका हा विशेष चर्चेचा विषय ठरला. फडणवीस म्हणाले की, ज्याप्रमाणे विष्णुपंत पागनीस यांचं नाव घेतलं की संत तुकारामांची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि निळू फुले म्हटलं की त्यांच्या साकारलेल्या प्रभावी राजकीय व्यक्तिरेखा आठवतात, त्याचप्रमाणे आता प्रसाद ओक म्हटलं की ‘धर्मवीर आनंद दिघे’ ही प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. हे शब्द ऐकताच प्रसाद ओक भावूक झाला. त्याने जागेवरून उठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हात जोडत नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली. या क्षणाने पुरस्कार सोहळ्यातील उपस्थितांचंही लक्ष वेधून घेतलं.

फडणवीस यांनी पुढे प्रसाद ओक यांच्या आगामी कामाबाबतही उत्सुकता व्यक्त केली. भविष्यात ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भूमिका साकारणार असल्याचा संदर्भ देत, पुढील काळात ‘प्रसाद ओक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ असं म्हणण्याची वेळ येऊ शकते, असं त्यांनी नमूद केलं. भूमिकेत पूर्णपणे समरस होण्याच्या प्रसाद ओक यांच्या क्षमतेचंही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. आनंद दिघे यांना प्रत्यक्ष पाहिलं नसलेल्या पिढीसाठी प्रसाद ओक यांनी पडद्यावर उभी केलेली व्यक्तिरेखा इतकी प्रभावी आणि हुबेहुब आहे की, त्यांच्या मनात आनंद दिघे यांची प्रतिमा कदाचित कायमस्वरूपी याच रूपात राहील, असं त्यांनी सांगितलं.

प्रसाद ओकने आतापर्यंत 125 चित्रपटांमध्ये काम केल्याचा उल्लेखही यावेळी झाला. मात्र, एवढ्या लवकर त्याला जीवनगौरव पुरस्कार मिळणार नाही, अजून अनेक पुरस्कार त्यांनी स्वीकारायचे आहेत, असं म्हणत फडणवीस यांनी त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us