Dada Kondke : भावाच्या आग्रहाखातर दादा कोंडके यांनी केलेलं लग्न, चार वर्षातच संसार मोडकळीस; घटस्फोटानंतर…

Dada Kondke Marriage And Divorce : दादा कोंडके त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. दादा कोंडके यांचं पहिलं लग्न झालेलं.

Dada Kondke : भावाच्या आग्रहाखातर दादा कोंडके यांनी केलेलं लग्न, चार वर्षातच संसार मोडकळीस; घटस्फोटानंतर...
| Updated on: Nov 02, 2026 | 4:04 PM

दादा कोंडके यांचं नाव घेताच त्यांच्या विनोदी भूमिका, भन्नाट संवाद आणि एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपट डोळ्यांसमोर येतात. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले. मात्र, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी चर्चा होताना दिसत नाही. दादा कोंडके यांनी आपल्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. याच आत्मचरित्रातून त्यांच्या लग्नाबद्दल माहिती समोर आली. दादा कोंडके यांचं लग्न नलिनी नावाच्या महिलेशी झालं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही.

मोठ्या भावाच्या आग्रहामुळे लग्नाला दिला होकार

Loading...

दादा कोंडके यांनी आत्मचरित्रात केलेल्या उल्लेखानुसार, लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव खोडकर होता. जसजसे ते मोठे होत गेले, तसतसा त्यांचा वात्रटपणाही वाढत गेला. त्यामुळे त्यांच्या मोठ्या भावाला त्यांच्या भविष्याची चिंता वाटू लागली होती. दादांनी संसारात स्थिर व्हावं, या विचारातून त्यांच्या मोठ्या भावानं त्यांच्या लग्नाचा विषय काढला. मात्र, दादा कोंडके यांना त्यावेळी लग्न करण्याची विशेष इच्छा नव्हती. मुंबई कामगारमध्ये नोकरी मिळाल्यानंतर ते आपल्या कामात रमले होते. मोठ्या भावाकडून लग्नासाठी वारंवार आग्रह होत असल्यानं अखेर त्यांनी लग्नाला होकार दिला. नलिनी यांच्याशी लग्न ठरल्यानंतर दादांनी फारशा अपेक्षा न ठेवता लग्नाचा निर्णय घेतला.

१९६४ मध्ये लग्न नंतर बदललं आयुष्य

दादा कोंडके आणि नलिनी यांचं लग्न १९६४ मध्ये झालं. त्यावेळी मुंबईत स्वतःचं घर नसल्यामुळे त्यांनी पत्नीला आपल्या मोठ्या भावासोबत आणि वहिनीसोबत इंगवली येथे ठेवलं होतं. दादा स्वतः मुंबईत मित्रासोबत एका खोलीत राहत होते.

दरम्यान, १९६५ मध्ये त्यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. या नाटकामुळे दादा कोंडके यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आणि आर्थिक परिस्थितीही सुधारू लागली. यानंतर त्यांनी मुंबईतील परळ परिसरात स्वतःचं घर घेतलं. त्यानंतर पत्नी नलिनी यांनाही मुंबईत आणलं. मात्र, याच काळात त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी निर्माण होऊ लागल्या.

नाटकाच्या दौऱ्यांमुळे संसारात दुरावा?

‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्याचे प्रयोग महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होत असल्यामुळे दादा कोंडके यांना सतत दौरे करावे लागत होते. त्यामुळे ते अनेकदा घरापासून दूर असायचे आणि नलिनी यांना मुंबईतील घरी एकटं राहावं लागायचं.

काळाच्या ओघात दोघांमधील संबंध बिघडल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या नात्यात नेमकं काय घडलं, याबाबत दादा कोंडके यांनी आपल्या आत्मचरित्रात सविस्तर माहिती देणं टाळलं.

दादा कोंडके आणि नलिनी यांचं वैवाहिक नातं अखेर टिकू शकलं नाही. १९६८ मध्ये दोघे कायदेशीररीत्या विभक्त झाले. लग्नानंतर अवघ्या चार वर्षांत त्यांचा संसार संपुष्टात आला. मिळालेल्या वृत्तांनुसार, घटस्फोटानंतर दादा कोंडके यांना नलिनी यांना ४० हजार रुपये पोटगी म्हणून द्यावे लागले होते. त्या काळाच्या तुलनेत ही मोठी रक्कम मानली जात होती. या घटनेनंतर दादा कोंडके यांनी आपल्या व्यावसायिक आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकप्रियतेची नवी उंची गाठली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us