दीपिकाचा ‘छपाक’, रजनीकांतचा ‘दरबार’ की अजय देवगणचा ‘तान्हाजी’, कोण मारणार बाजी?

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘छपाक (Chhapaak Review), अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी’ (Tanhaji) आणि थलैवा रजनीकांतचा ‘दरबार’ (Darbar) हे तीन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत.

  • कपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 10:33 AM, 9 Jan 2020

मुंबई : बॉक्स ऑफिसवर 2020 या नववर्षाची सुरुवात दणक्यात होत आहे. कारण वर्षाच्या सुरुवातीलाच तीन मोठ्या सिनेमांची टक्कर बॉक्स ऑफिसवर होत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘छपाक (Chhapaak Review), अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी’ (Tanhaji) आणि थलैवा रजनीकांतचा ‘दरबार’ (Darbar) हे तीन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. पहिल्यांदाच वर्षाच्या सुरुवातीलाच कुठलाही मोठा वीकेंड नसताना महत्त्वाच्या सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होत असल्यामुळे, प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती देणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित आणि दीपिकाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छपाक’ सिनेमा अॅसिड अटॅकग्रस्त लक्ष्मीच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमातून संवेदनशील विषय हाताळण्यात आला आहे. दीपिकाचा सिनेमातील लूकही सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. त्यामुळे या सिनेमाकडून सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत.

ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तान्हाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा थ्रीडी मध्ये मोठ्या पडद्यावर रसिकांना बघायला मिळणार आहे. हा सिनेमा खऱ्या अर्थाने रसिकांसाठी व्हिज्युअली ट्रीट आहे. अजय देवगण, काजोल, सैफअली खान, शरद केळकर अशी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे रसिकांनाही सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा आहेत.

या दोन सिनेमांना टक्कर देण्यासाठी थलैवानेही दरबार सिनेमाच्या निमित्तानं बाह्या सरसावल्या आहेत. विशेष म्हणजे या अॅक्शन थ्रिलर सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे ए.आर. मुरगुदास यांनी. त्यामुळे ही जोडी बॉक्स ऑफिसवर काय कमाल करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

खऱ्या अर्थाने हा वीकेंड बॉलिवूडसाठी मोठा आहे. त्यामुळे आता या बिग फाईटमध्ये कोणता सिनेमा बाजी मारतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.