आराध्या बच्चन हिच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाचे गूगल, यूट्यूबला समन्स, काय दिल्या सूचना?

न्यायाधीश म्हणाले, प्रत्येक बालकाला समान अधिकार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरू नये, याची जबाबदारी युट्यूबने घ्यावी...

आराध्या बच्चन हिच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाचे गूगल, यूट्यूबला समन्स, काय दिल्या सूचना?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 20, 2023 | 12:50 PM

नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची नात तसेच अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या संबंधी याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. फेक न्यूजविरोधात दिल्ली हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. जस्टिस सी हरि शंकर यांच्या पीठाने आराध्या बच्चन हिच्यासंबंधी वेगवेगळ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून सुरु असलेल्या खोट्या बातम्या काढण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या खोट्या बाम्या शेअर केल्या जाऊ नयेत, असं कोर्टाने म्हटलंय. याचिकेत गूगल आणि यूट्यूबला पक्षकार बनवण्यात आलं होतं. या दोन्ही कंपन्यांना कोर्टाने समन्स जारी केले आहे.

कोर्टाने काय म्हटलं?

कोर्टाने यासंदर्भातील युट्यूब व्हिडिओवर आक्षेप घेतला. न्यायाधीश म्हणाले, प्रत्येक बालकाला समान अधिकार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरू नये, याची जबाबदारी युट्यूबने घ्यावी… मिस वर्ल्डचा किताब भूषवणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या हिच्या आजाराविषयीच्या अफवांमुळे बच्चन कुटुंबीय नाराज होते. त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली. त्यामुळे ११ वर्षांच्या आराध्याच्या वतीने दिल्ली हायकोर्टात खोट्या बातम्यांविरोधात बॉलिवूड टाइम्ससह इतर अनेक युट्यूब चॅनलविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

युट्यूबवर प्रश्नांची सरबत्ती

आराध्या बच्चनचे वकील दयान कृषणन यांनी तिची बाजू मांडली. कोर्टाने त्यांची बाजू ऐकून घेतली. कोर्ट  You Tube च्या वकिलांना म्हणाले, तुमच्याकडे अशा गोष्टींसाठी निश्चित धोरण नाही का? अशा प्रकारची माहिती युट्यूबवरून प्रसारीत होतेय, हे कळल्यावर या गोष्टीतून मार्ग काढम्यासाठी काही उपाय नाही का? एक युट्यूब प्लॅटफॉर्म असल्याने तुमची याबाबत काही जबाबदारी नाही का? जनतेला संभ्रमित करणारी माहिती दिली जाते, हे योग्य आहे का? तुम्ही या प्रत्येक प्लॅटफॉर्मकडून लाभ घेताय? की लोकांना मोफत अपलोड करण्याची परवानगी देताय? एखाद्या तक्रारदाराने तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत हजारो लोकांनी हे पाहिलेलं असतं. युट्यूब काही दानधर्मासाठी चालत नाही. हे लाभ कमावण्याचं व्यासपीठा आहे. त्यामुळे तुमचे धोरण सदोष आहे…