Deool Band 2: अवघ्या 4 दिवसांत ‘देऊळ बंद 2’चा बजेट वसूल; आतापर्यंत किती कमावला नफा?
Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या या चित्रपटाने गेल्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चार दिवसांत या चित्रपटाच्या बजेटचाही आकडा वसूल झाल्याचं समजतंय. जाणून घ्या 'देऊळ बंद 2'ची आतापर्यंतची कमाई..

जवळपास दशकभरापूर्वी यशस्वी ठरलेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा सीक्वेल नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सीक्वेल असला तरी ‘देऊळ बंद 2’मध्ये अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पूर्णपणे नवीन कथा नव्या दृष्टीकोनातून मांडली आहे. स्वत: शेतकरी असलेल्या प्रवीण तरडेंनी या सीक्वेलमध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. 21 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. वीकेंडला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाची कमाई जोरदार झाली. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर आता प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’साठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, त्यांना मिळणारं सुमार दर्जाचं बी-बियाणं, बनावट खतं, कीटकनाशकं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या सगळ्या वास्तवाची मांडणी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण तरडेंची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेनं महिला शेतकरीची मुख्य भूमिका साकारली आहे. तिचा नवरा, सासू हे स्वामीभक्त असतात, ती मात्र नास्तिक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी खूप कष्ट करायची तिची तयारी आहे. तर दिग्गज अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहेत.
‘देऊळ बंद 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 3.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही 3.11 कोटी रुपयांची कमाई झाली होती. तिसऱ्या दिवशी या कमाईत वाढ होऊन आकडा 5.21 कोटी रुपयांवर पोहोचला. त्यामुळे ‘देऊळ बंद 2’ची तीन दिवसांची कमाई 11.37 कोटी रुपये इतकी झाली आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी 5.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘देऊळ बंद 2’ची आतापर्यंतची कमाई-
पहिला दिवस- 3.05 कोटी रुपये
दुसरा दिवस- 3.11 कोटी रुपये
तिसरा दिवस- 5.21 कोटी रुपये
चौथा दिवस- 5.90 कोटी रुपये
एकूण कमाई- 17.27 कोटी रुपये
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा बजेट जवळपास नऊ ते दहा कोटी रुपये आहे. त्यामुळे बजेटचा हा आकडा कमाईतून आधीच वसूल झाला आहे. चित्रपटाने नफासुद्धा कमवायला सुरुवात केली आहे. स्नेहल तरडे आणि मोहन जोशी या दोन मुख्य कलाकारांनी हा संपूर्ण चित्रपट उचलून धरला आहे, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहेत.