
‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने 14 डिसेंबर 2022 रोजी लग्न केलं. जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी तिने लग्नगाठ बांधली. दुसऱ्या धर्मात लग्न केल्याने देवोलीनाला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. परंतु या ट्रोलिंगचा तिने तिच्या आयुष्यावर कोणताच परिणाम होऊ दिला नाही. देवोलीनाने वेळोवेळी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलासोबतचे काही फोटो पोस्ट केले. हे फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी देवोलीनाच्या मुलाच्या दिसण्यावरून कमेंट्स करायला सुरुवात केली. चिमुकल्या मुलाच्या वर्णावरून काही युजर्सनी टीका केली. इतकंच नव्हे तर ‘किती काळा दिसतोय’ अशा हिणवणाऱ्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत.
देवोलीनाने 18 डिसेंबर 2024 रोजी मुलाला जन्म दिला. ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून पती आणि मुलासोबतचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती सतत शेअर करत असते. नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये देवोलीनाच्या मुलाचा चेहरासुद्धा पहायला मिळत आहेत. परंतु त्याच्या दिसण्यावरून काही नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने तर मर्यादा ओलांडत असंही म्हटलं की, जर देवोलीनाने गोऱ्या व्यक्तीशी लग्न केलं असतं, तर तिचं बाळसुद्धा गोरं असतं.
देवोलीना आणि शाहनवाज हे पहिल्या लॉकडाऊनदरम्यान एकमेकांना भेटले होते. “आमच्या लग्नासाठी कुटुंबीयांची परवानगी घ्यायला थोडा वेळ लागला. त्यामागे अर्थात धर्म हे कारण होतं. आंतरधर्मीय लग्नाच्या वेळी हे सर्वसामान्य आहे. आमच्या कुटुंबीयांना आम्ही खूप समजावलं, काही गोष्टी वरखाली झाल्या पण अखेर त्यांनी होकार दिला. जेव्हा तुम्ही ठरवता की या व्यक्तीसोबत मला माझं आयुष्य जगायचंय, तेव्हा तुम्ही सर्व प्रयत्न करता”, असं शाहनवाज एका मुलाखतीत म्हणाला होता.
आंतरधर्मीय लग्नाविषयी देवोलीना म्हणाली होती, “होय, माझ्या कुटुंबीयांना समस्या होती. आजही आंतरधर्मीय लग्नाला परवानगी नाही. आई, भाऊ आणि जवळपास इतर सर्व कुटुंबीयांचा नकार होता. फक्त मावशी आणि माझ्या मोठ्या काकांनी पाठिंबा दिला होता. माझी आई लग्नालाही येणार नव्हती. परंतु नंतर तिचं मन बदललं.”