Ikkis OTT Release: धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहता येणार?

Ikkis OTT Release: दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा अखेरचा चित्रपट 'इक्कीस' सध्या बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करताना दिसत नाहीये. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाची मुख्य भूमिका आहे. 'इक्कीस' लवकरच ओटीटीवर येणार आहे.

Ikkis OTT Release: धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट इक्कीस ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहता येणार?
Ikkis movie
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 12, 2026 | 2:55 PM

अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदाने ‘इक्कीस’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. जानेवारी महिन्यात हा बहुचर्चित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटाने चांगली कमाई केली, परंतु रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’समोर त्याला टिकता आलं नाही. तरीसुद्धा या बायोग्राफिकल ड्रामाला प्रेक्षक-समिक्षकांकडून विशेष कौतुक झालं. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. त्यांच्या निधनानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यामुळे थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर त्यांना पाहताना देओल कुटुंबीयांसह चाहते भावूक झाले होते. आता लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.

‘इक्कीस’ ओटीटीवर

‘इक्कीस’च्या थिएट्रिकल व्हर्जनच्या सुरुवातीच्या श्रेयनामावलीत सांगितलं गेलं की या चित्रपटाचा अधिकृत स्ट्रीमिंग पार्टनर प्राइम व्हिडीओ आहे. म्हणजेच थिएटरनंतर हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. सर्वसामान्यपणे कोणत्याही चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या सहा ते आठ आठवड्यांनंतर ओटीटीवर आणलं जातं. त्यामुळे ‘इक्कीस’सुद्धा येत्या 12 ते 26 फेब्रुवारीदरम्यान ओटीटीवर येण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मकडून लवकरच याविषयीची घोषणा करण्यात येईल.

‘इक्कीस’ची कमाई

‘इक्कीस’ने पहिल्याच दिवशी 7 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर पहिल्या आठवड्यात 25.5 कोटी रुपयांची कमाई झाली. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी 85 लाख रुपये कमावले. दुसऱ्या आठवड्यांत कमाईत थोडीफार तेजी पहायला मिळाली. दहाव्या दिवशी कमाईचा आकडा 1.15 कोटी आणि अकराव्या दिवशी 1.25 कोटी रुपयांवर पोहोचला. या चित्रपटाने भारतात 11 दिवसांत जवळपास 28.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘इक्कीस’ या चित्रपटात सर्वांत तरुण परमवीर चक्र विजेता, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल (अगस्त्य नंदा) यांच्या आयुष्यावर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान बसंतरच्या लढाईचं चित्रण करण्यात आलं आहे. यात लढाईत अरुण खेत्रपाल शहीद झाले होते. या चित्रपटात दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी अरुणचे वडील ब्रिगेडियर मदनलाल खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. मुलगा शहीद झाल्यानंतर 30 वर्षांनी ते पाकिस्तानला भेट देतात. तर अभिनेता जयदीप अहलावत यामध्ये ब्रिगेडियर जान मोहम्मद निसारच्या भूमिकेत आहे.