
Rehman Dakait: आदित्य धर याचा चित्रपट ‘धुरंधर’ थिएटर्समध्ये कमाल दाखवत आहे. अवघ्या 13 दिवसात या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड मोडले आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना याच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचले आहे. अक्षय खन्ना याने या सिनेमात रहमान डकैतची भूमिका केली आहे. तो कराचीमधील लियारी भागातील कुख्यात गँगस्टर होता. तो दोनदा पोलिसांना चकमा देऊन फरारा झाला होता. दुसऱ्यांदा मात्र त्याला एक चूक भोवली आणि त्याचा एनकाऊंटर झाला. काय होती त्याची ती चूक?
रहमान डकैतचे खरे नाव सरदार अब्दुल रहमान बलोच असे होते. त्याला शिक्षणाची आवड होती. पण घरच्या आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळे त्याने 13 व्या वर्षीच गुन्हेगारीची वाट निवडली. एका दंग्यात त्याने चाकूने दुसऱ्यावर वार केले. पुढे काही वर्षात त्याने आणि त्याच्या मित्राने दोघांचा खून केला. त्यानंतर आपला दबदबा त्याने तयार केला. 1995 मध्ये त्याने आईचा खून केला. पोलिसांची खबरी असल्याचा संशयावरून त्याने खून केल्याचा दावा करण्यात येतो. तर काहींच्या मते कौटुंबिक वादातून त्याने आई खदिजाचा खून केला.
हाजी लालू या गँगस्टरने त्याला खरी साथ दिली आणि तो तिथल्या टोळ्यांचा म्होरक्या झाला. त्यावेळी कराचीत तीन टोळ्यांचे राज्य होते. त्याला अनेकदा अटक झाली. तर त्याने तुरुंगाची हवा सु्द्धा खाल्ली. त्यानंतर कोर्टात हजर होण्यापूर्वीच त्याने पोलिसांना चकमा दिला आणि तो फरार झाला. पुढे तर राजकारणात शिरून त्याने चांगलीच मांड ठोकली. 2006 पर्यंत त्याने लियारी भागच नाही तर कराची आणि जवळपासच्या भागावर पकड मजबूत केली. त्याने इराणपर्यंत मालमत्ता खरेदी केल्याचे सांगितले जाते. ड्रग्स, पत्त्याचे अड्डे, जमीन व्यवहार आणि कराची बंदरातील माल यामुळे तो झटपट श्रीमंत झाला. पण यादरम्यान त्याचे अनेक शत्रूही तयार झाले.
आसिफ अली झरदारींचा फोन
रहमान डकैतचे जे भरवशाचे मित्र होते. त्यांचे व्यवहारातून वितुष्ट आले. ट्रान्सपोर्ट व्यवसायातून जास्त खटके उडाले. अर्शद पप्पू आणि रहमान डकैतमध्ये चांगलेच वाजले. तर फैज मोहम्मद बलोच याच्या वडीलांच्या हत्येनंतर दोघे समोरासमोर आले. लिआरीत गँगवॉर भडकण्यामागे हा कळीचा मुद्दा ठरला. या गँगवॉरमध्ये हजारो लोक मारल्या गेली. दोन्ही बाजूच्या लोकांचे मुडदे पडू लागले. तर 18 जून 2006 रोजी एसपी चौधरी असलम आणि लियारी पोलिसांच्या संयुक्त पथकाने रहमान याला अटक केली. पण पाकिस्तानचे राष्ट्रपती राहिलेल्या आसिफ अली झरदारींनी चौधरी यांना फोन करून त्याचा एनकाऊंटर न करण्याची ताकीद दिली. त्यानंतर ही अटक लपवण्यात आली.
असा सटकला रहमान
रहमानला पोलीस निरीक्षक बाबर याच्या घरात त्याला नजरकैदत ठेवण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी अनेक प्रकरणांचा उलगडा केला. त्याचे कोणाकोणाशी संबंध आहेत. त्याची मालमत्ता कुणाच्या नावे आहे. त्याला कुठून कुठून पैसा येतो याची बरीच माहिती पोलिसांनी मिळवली. या नजरकैदेतून रहमान पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याने एका पोलिसांशी चांगली ओळख केली. त्याला कराची मधील त्याच्या घरून बाबर याच्या घरी जेवणाचा डब्बा येत होता. त्यातूनच मग रहमान डकैतने एक चिठ्ठी पाठवली आणि त्याच्या साथीदारांनी बाबर यांच्या घरात प्रवेश करून पोलिसांना बांधले आणि रहमान पळाला.
ही चूक आणि झाला गेम
रहमान पुन्हा पळून गेल्याने पोलिसांच्या क्षमतेवर आणि त्यांच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले. पोलिसांवर मोठा दबाव आला. रहमानला कोणी कोणी मदत केली याची यादी तयार करण्यात आली. रहमान कुठे पळून जाऊ शकतो हे ट्रेस करण्यात येऊ लागले. अनेक महिने पोलीस त्याच्या मागावर होते. 2009 मध्ये पोलिसांच्या हाती मोठा सुगावा लागला. रहमान डकैत बलुचिस्तानला पळून जाणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. जागोजागी चेकपोस्ट तयार करुन शोध मोहिम राबविण्यात येत होती. त्याचदरम्यान अकील बलूच, औरंगजेब बाबा आणि नजीर बाला हे तिघे त्याच्या सोबत होते. यातील एकाने त्याच्या बायकोला फोन करून जेवण तयार ठेवण्यास सांगितले आणि हा फोनच पोलिसांना कामी आला. रहमान डकेतचे लोकेशन कळले. पोलिसांनी झिरो पाईंटवर त्याला अडवले. या चकमकीत तो साथीदारासह ठार झाला तर काहींच्या मते त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना कुणाचा तरी फोन आला आणि नंतर रहमान डकैतचा फेक एनकाऊंटर करण्यात आला.