
सध्या बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर धुरंधर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. याच चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाची पार्श्वभूमी आणि हेरगिरी याची उत्तम सांगड घालून दिग्दर्शक आदित्य धरने हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला असून दररोज मागचे रेकॉर्ड मोडून कमाईचे नवीन उच्चांक हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. पण त्याच्यापेक्षा अक्षय खन्नाने रंगवलेला रहमान डकैत हा डॉन प्रेक्षकांना जास्त भावला आहे. अक्षय खन्नाची एक डान्स स्टेप सुद्धा सोशल मीडियावर हिट ठरली आहे. त्यासोबतच Day 1 As a Spy in Pakistan हा ट्रेंड सुद्धा सोशल मीडियावर सुरु आहे.
त्यावर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता वालावलकर व्यक्त झाली आहे. तिने Spy in Pakistan चे रिल्स बनवणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सना चांगलचं झापलं आहे. “एवढं तुम्हाला सोपं वाटतं का स्पायचं काम? ज्यावर आपण रिल्स बनवू शकतो, जोक करु शकतो. स्पाय बनणं हे तितकं सोप नाहीय. एका वेगळ्या देशात वेगळ्या ओळखीसह ते राहत असतात. तिथून ते देशसेवाच करत असतात. सतत तणावाखाली असताना हुशारी दाखवून देशसेवा करणं हे सोपं नाहीय. कुटुंबापासून लांब राहून, जिथे आपला जीव एखाद्या चुकीमुळे जाऊ शकतो. जशी आर्मी आपल्याला प्रिय आहे, तसे हे स्पाय सुद्धा देशसेवा करत असतात” असं अंकिता म्हणाली.
मग अशावेळी तुम्ही काम करु शकता का?
“एका वेगळ्या ओळखीसह स्पाय शत्रू राष्ट्रात राहत असतात. थोडसं वाचन करा यार, काहीच नाही तर रविंद्र कौशिक यांच्याबद्दल थोडसं वाचा. आजच जग हे फेम आणि क्रेडिटवर चालतं. पण या स्पायना कुठलही फेम आणि क्रेडिट मिळत नाही. मग अशावेळी तुम्ही काम करु शकता का त्याजागी? याचाही विचार करा. आलाय आपला ट्रेंड म्हणून बनवायची रील हे थांबवा. रवींद्र कौशिक यांना ब्लॅक टायगर का म्हटलं जातं? त्यांनी काय केलय? या बद्दल वाचा” असा आवाहन अंकिताने केलं.
प्रेक्षकच समीक्षक बनले
धुरंधर चित्रपटाचा दुसरा भागही येणार आहे. पण पहिल्या भागानेच अनेकांना वेड लावलय. सोशल मीडियावर खासकरुन इन्स्टाग्रामवर प्रेक्षकच समीक्षक बनले आहेत. ते चित्रपटाच्या जमेच्या बाजू सांगत आहेत आणि विरोध करणाऱ्यांना शब्द बाणांनी घायाळ करत आहेत.