सर्जरीनंतर माझी प्रकृती..; कॅन्सरग्रस्त दीपिकाला अश्रू अनावर, शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर

अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्यावरील कॅन्सरच्या सर्जरीनंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आली. शोएबने त्याच्या व्लॉगद्वारे दीपिकाच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली. यावेळी चाहत्यांशी बोलताना दीपिका भावूक झाली होती.

सर्जरीनंतर माझी प्रकृती..; कॅन्सरग्रस्त दीपिकाला अश्रू अनावर, शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर
Dipika Kakar and Shoaib Ibrahim
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2025 | 2:29 PM

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करवर काही दिवसांपूर्वीच खूप मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. दीपिकाला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालं आहे. तिच्या प्रकृतीविषयीची प्रत्येक अपडेट तिचा पती शोएब इब्राहिम व्लॉग आणि सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देतोय. आता सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आली. शोएबने नुकत्याच त्याच्या एका व्लॉगमध्ये दीपिकाची झलक सर्वांना दाखवली. त्याचसोबत दीपिकानेही तिच्या प्रकृतीविषयी माहिती चाहत्यांना दिली. यावेळी चाहत्यांनी तिच्यासाठी केलेल्या प्रार्थनांबद्दल आभार व्यक्त करताना ती भावूक झाली होती.

या व्लॉगच्या सुरुवातीलाच शोएबने दीपिकाच्या आरोग्याविषयी माहिती दिली. दीपिकाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून तिच्या इतर अनेक चाचण्या बाकी आहेत, असं त्याने सांगितलं. “दीपिकाला खोकल्यामुळे टाके दुखत होते. पण आता ती पूर्वीपेक्षा बरी आहे. दीपिकाला आधी आयसीयूची खूप भीती वाटत होती. शस्त्रक्रियेपूर्वी जेव्हा डॉक्टरांनी तिला दोन-तीन दिवस आयसीयूमध्ये राहावं लागेल असं सांगितलं, तेव्हापासून ती खूप घाबरली होती. अखेर आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती शांत झोपली”, असं तो म्हणाला. त्यानंतर शोएबने दीपिकाची ओळख करून दिली.

दीपिकाने तिच्या हॉस्पिटलच्या बेडवरून चाहत्यांशी संवाद साधला. तिच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल तिने सर्व चाहत्यांचे आभार मानले. चाहत्यांना तब्येतीविषयी सांगताना दीपिकाला अश्रू अनावर झाले. पाणावलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली, “माझ्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. शोएबने सांगितल्याप्रमाणे मला खोकल्याचा त्रास जाणवत होता. खोकल्यामुळे माझ्या टाक्यांवर खूप ताण येत होता. पण आता मी पूर्वीपेक्षा खूप बरी आहे.” हे सांगतानाच दीपिकाला रडू कोसळतं, तेव्हा शोएब तिला आधार देतो. शस्त्रक्रिया झाल्यापासून ती खूप भावनिक झाल्याचं शोएब यावेळी चाहत्यांना सांगतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरही तिला रडू कोसळतंय.

दीपिकाची सासू, आई आणि मुलगा रुहानदेखील तिला भेटण्यासाठी रुग्णालयात येतात. मुलाला भेटल्यानंतर दीपिका खूपच खुश झाली होती. यावेळी तिने कुटुंबीयांसोबत काही वेळ घालवला. तब्बस 14 तासांच्या सर्जरीनंतर आता दीपिकाला चालताना, बोलताना पाहून चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.