माफ कर भाऊ.. सोनं, पैसा सगळंच चोरलं पण चिठ्ठीसह परत केला राष्ट्रीय पुरस्कार

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एम. मणिकंदन यांच्या घरात चोरीची घटना घडली आहे. या घटनेची चर्चा मात्र एका वेगळ्याच कारणामुळे होत आहे. कारण चोरांनी त्यांच्या घरातून सोनं, पैसा सगळंच चोरलं, पण माफीची चिठ्ठी लिहून राष्ट्रीय पुरस्कार परत केला.

माफ कर भाऊ.. सोनं, पैसा सगळंच चोरलं पण चिठ्ठीसह परत केला राष्ट्रीय पुरस्कार
Director M Manikandan
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 14, 2024 | 8:57 AM

चेन्नई : 14 फेब्रुवारी 2024 | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एम. मणिकंदन यांच्या चेन्नईमधल्या घरी चोरी झाली आहे. चोरांनी त्यांच्या घरातील सोनं, पैसा आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्या, मात्र त्यांनी दिग्दर्शकांचा राष्ट्रीय पुरस्कार परत केला. आश्चर्याची बाब म्हणजे दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार परत करताना त्यांनी सोबत एक चिठ्ठीसुद्धा सोडली. या चिठ्ठीमध्ये त्यांनी दिग्दर्शकांची माफीसुद्धा मागितली आहे. मणिकंदन हे ‘काका मुत्तई’ आणि ‘कदैसी विवासयी’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. या चोरीच्या घटनेप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

चिठ्ठीसह परत केला पुरस्कार

पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर काही दिवसांनी चोरांनी दिग्दर्शकांचा राष्ट्रीय पुरस्कार परत केला. या चोरांनी एका प्लास्टिकच्या पिशवीत ट्रॉफी आणि चिठ्ठी ठेवून मणिकंदन यांच्या घराच्या बाहेर भिंतीला ती पिशवी लटकवली होती. जेव्हा मणिकंदन आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही पिशवी दिसली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. राष्ट्रीय पुरस्कारासह त्यात असलेल्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं, ‘आम्हाला माफ करा भाऊ, तुमची मेहनत ही तुमचीच आहे.’ चोरांनी जरी राष्ट्रीय पुरस्कार परत केला असला तरी त्यांनी चोरी केलेली रक्कम आणि सोनं अद्याप परत केलं नाही.

मित्राला समजली चोरीची घटना

मणिकंदन हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत चेन्नईमध्ये राहतात. त्यांच्याकडे एक पाळीव श्वान असून त्याची देखभाल मणिकंदन यांचे मित्र करतात. या चोरीची माहिती सर्वांत आधी त्यांच्या मित्रालाच मिळाली. त्यांचा मित्र जेव्हा श्वानाला काही खायला द्यायला आला होता, तेव्हा त्यांना चोरीविषयी समजलं. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

मणिकंदन यांनी ‘काका मुत्तई’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांचे ‘कुट्टराम थंडानई’ आणि ‘आनंदवन कट्टलाई’ यांसारखे प्रोजेक्ट्ससुद्धा हिट ठरले. त्यांची एक वेब सीरिज लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहे.