आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा..

करिअरमध्ये आपल्या सोबतची व्यक्ती पुढे जाऊ लागली की अनेकांना त्यांच्याबद्दल असुरक्षित वाटू लागतं. कलाविश्वातील महानायक म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ यांना त्यांच्या आजवरच्या आयुष्यात कधीच कोणाविषयी असं असुरक्षित वाटलं नाही.

आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा..
Ashok Saraf
Image Credit source: Instagram
| Updated on: May 04, 2025 | 11:54 AM

एखाद्या श्रेत्रात आपल्या सोबतची व्यक्ती आपल्या पुढे जाऊ लागली की काहींना असुरक्षित वाटू लागतं. मग अशातून एकमेकांविषयी ईर्षा, द्वेष आणि नकारात्मक स्पर्धा यांचा जन्म होऊ लागतो. मग अशा वेळी दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या खऱ्या आयुष्यातील शिकवण प्रत्येकाने लक्षात ठेवण्याजोगी आणि आत्मसात करण्यासारखी आहे. ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात अशोक सराफ यांनी यासंबंधीचा एक प्रसंग सांगितला आहे. जेव्हा अशोक सराफ स्टेट बँकेत नोकरी करायचे, तेव्हाचा हा प्रसंग आहे.

एकेदिवशी मोहन भंडारी हे अशोक सराफ यांच्याच डिपार्टमेंटमध्ये डिस्पॅचचं काम करायला रुजू झाले. हे दोघं नऊ वर्षं एकत्र होते. त्यांच्यात खूप घट्ट मैत्री झाली. मोहन भंडारी यांना अशोक मामांमुळेच नाटकाची चटक लागली होती. एकदा ते अशोक सराफ यांच्याबरोबर पहिल्यांदा तालीम बघायला गेले. मग एकाने त्यांना प्रॉम्पिंगचं काम दिलं. हळूहळू तेदेखील अभिनयही करू लागले. हिंदी थिएटर, टीव्ही मालिका, काही सिनेमे अशी त्यांची कारकीर्द चांगली बहरली.

मोहन भंडारींसोबतच्या मैत्रीबद्दल अशोक सराफ म्हणाले, “आपल्याबरोबर काम करणाऱ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्यात एक वेगळीच मजा असते. समाधान असतं. काही जणांना बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटायला लागतं. माझ्या आजवरच्या आयुष्यात एकदाही माझ्या मनात ही असुरक्षिततेची भावना आलेली नाही. कारण माझा फोकस नेहमी माझ्यावरच राहिलेला आहे. मला काय करायचंय यावर राहिलेला आहे. इतर काय करत आहेत, त्यांना किती मोठ्या भूमिका मिळत आहेत, हे माझ्या दृष्टीने नेहमीच गौण होतं.”

सहकलाकारांना कधी मदत लागली तर ती करण्यातही अशोक मामा अग्रेसर असायचे. कारण आपल्याला आपल्या ज्येष्ठांकडून मोकळ्या मनानं मदत मिळालेली असेल तर आपणही तितक्यात मोठेपणानं आपल्यापेक्षा लहानांना मदत करावी, असं अशोक सराफ यांना वाटतं. स्वत:च्या कामाविषयी आत्मविश्वास हवा, दुसऱ्यांपेक्षा आपण वेगळं काहीतरी करायला हवं असा अट्टहास हवा, असं ते म्हणतात.