दारुच्या नशेत दिग्दर्शकाच्या कारने जमावाला चिरडलं; एकाचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी

कोलकातामधील ठाकूरपुकूर बाजार परिसरात रविवारी अत्यंत भयानक घटना घडली. दारुच्या नशेत एका टीव्ही दिग्दर्शकाच्या कारने जमावाला चिरडलं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

दारुच्या नशेत दिग्दर्शकाच्या कारने जमावाला चिरडलं; एकाचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी
Siddhant Das
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 07, 2025 | 8:50 AM

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधल्या सर्वांत गर्दीच्या ठाकूरपुकूर परिसरात रविवारी सकाळी एका कारने जमावाला चिरडलं. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर जवळपास आठ जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक टेलिव्हिजन आणि चित्रपट दिग्दर्शक ही कार दारूच्या नशेत चालवत होता. सिद्धांत दास असं त्याचं नाव असून अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत एका प्रसिद्ध बंगाली वाहिनीचा कार्यकारी निर्मातीसुद्धा उपस्थित होता. या घटनेनंतर तिथल्या स्थानिकांनी दोघांना पकडलं आणि संतप्त जमावाने त्यांना मारहाण केली. सिद्धांत दास उर्फ विकटो याला ठाकूरपुकूर पोलिसांनी अटक केली.

ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा सिद्धांतच गाडी चालवत होता. कारमध्ये त्याच्यासोबत एका बंगाली वाहिनीची कार्यकारी निर्माती श्रिया बासू उपस्थित होती. संतप्त जमावापासून पोलिसांनी श्रियाचा बचाव केला आणि तिच्या कुटुंबीयांकडे तिला सोपवलं. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार आपल्या मालिकेचा यश साजरा करण्यासाठी त्यांनी शनिवारी रात्री कोलकातामधील साऊथ सिटी मॉलमध्ये मध्यरात्रीपर्यंत पार्टी केली होती. या पार्टीत अनेकांनी मद्यपान केलं आणि रात्री जवळपास 2 वाजताच्या सुमारास सर्वजण आपापल्या घरी निघाले. त्याचवेळी सिद्धांत दास आणि श्रिया बासू यांनी कारने शहरात फिरण्यास सुरुवात केली. दारुच्या नशेतच दोघं शहरात इथे-तिथे कारने फिरत होते. रविवारी सकाळी अचानक त्यांची कार ठाकूरपुकूर बाजारात शिरली आणि अनेकांना धडक दिली.

याविषयी कोलकाता पोलीस म्हणाले, “जवळपास साडेनऊ वाजताच्या सुमारास ठाकूरपुकूर बाजाराजवळ डायमंड हार्बर रोडवर एक कार अनेक पायी चालणाऱ्यांना धडक देत गेली. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना कस्तूरी नर्सिंग होम आणि CMRI रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. पोलिसांनी ड्रायव्हरसह कारला आपल्या ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल.”

सिद्धांतच्या कारने अनेक दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना धडक दिली आणि नंतर पार्क केलेल्या स्कूटरला धडकल्यानंतर ती कार थांबली, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. त्याच्या गाडीतून दारूच्या चार बाटल्या सापडल्या असून अपघाताच्या वेळीही सिद्धांत दारुच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालंय.