
बॉलिवूडमध्ये खूप कमी कलाकारांना यशाची चव चाखायला मिळते. शक्यतो अनेकजण मॉडेलिंगच्या जगात नाव कमावूनच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवतात. पण अभिनय क्षेत्रात आल्यानंतर प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही. काहींनी भरभरून यश मिळतं तर काहींना हे क्षेत्रच सोडावं लागतं. असाच एक अभिनेता ज्याने दमदार अभिनयासह बॉलिवूडमध्ये मॉडेलिंगच्या जगातून प्रवेश केला. एवढंच नाही तर त्याने चक्क श्रीदेवींसोबत काम केलं. पण यामुळे त्याला फेम मिळण्याऐवजी थेट हे क्षेत्रच सोडावं लागलं. कोण आहे हा अभिनेता माहितीये? चला जाणून घेऊयात.
हा अभिनेता त्यावेळी भारतातील सर्वात मोठ्या सुपरमॉडेलपैकी एक होता.
हा अभिनेता त्यावेळी भारतातील सर्वात मोठ्या सुपरमॉडेलपैकी एक होता. पण एका छोट्या भूमिकेमुळे आणि एका डायलॉगमुळे त्याचं करिअर उद्ध्वस्त झालं. या अभिनेत्याचं नाव दीपक मल्होत्रा. ज्याला यश चोप्रांनी लाँच केलं होतं. पण त्यामुळे फायदा तर काही झाला नाही उलट नुकसानच झालं. ‘लम्हे’ चित्रपटाच्या रिलीजनंतर त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली.
सर्वाधिक मानधन घेणारा मॉडेल बनला.
दीपक मल्होत्राचा जन्म 1964 मध्ये बंगळुरू येथे झाला. त्याने क्राइस्ट विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. तो राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्ट खेळाडू होता. तो उंच आणि सडपातळ शरीरयष्टीचा होता. यामुळे त्याला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर आल्या.80 च्या दशकात, तो संपूर्ण देशात सुपरमॉडेल म्हणून प्रसिद्ध झाला आणि सर्वाधिक मानधन घेणारा मॉडेल बनला. 1987 मध्ये, त्याची फी 1.5 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
बॉलिवूडमध्ये श्रीदेवीसोबत पदार्पण केलं
त्याची प्रसिद्धी पाहून त्यावेळी दीपक मल्होत्राला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यापैकी त्याने यश चोप्रा यांचा ‘लम्हे’ हा चित्रपट निवडला, जो त्याचा पहिला चित्रपट होता. ‘लम्हे’ चित्रपटातून त्याने श्रीदेवीसोबत पदार्पण केले होतं. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, वहीदा रहमान आणि अनुपम खेर देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. त्यात अभिनेत्रीची दुहेरी भूमिका होती. ती आई पल्लवी आणि मुलगी पूजा या दोघांच्याही भूमिकेत दिसली. दीपकच्या भूमिकेचे नाव सिद्धार्थ होते, ज्याच्याशी पल्लवी लग्न करते. तथापि, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्याचा या चित्रपटातील दीपकचा अभिनय आवडला नाही. समीक्षकांनी त्याच्यावर खूप टीका केली.
एका वाईट डायलॉगमुळे करिअर उद्ध्वस्त
एका सीनवरून त्याच्यावर टीकाही करण्यात आली. चित्रपटात एका ठिकाणी त्याने पल्लवीला बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी ‘पल्लो’ असं म्हटलं होतं, ज्यामुळे त्याची खूप खिल्ली उडवली गेली आणि यावर अनेक मीम्स देखील बनवले गेले. त्यानंतर त्याला राजीव मेहरा यांचा ‘चमत्कार’ हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता पण त्याने नकार दिला.त्याला यश चोप्राचा ‘डर’ चित्रपटही ऑफर करण्यात आला होता. पण जेव्हा दिग्दर्शकाला समजले की दीपकचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला आहे आणि त्याच्यावर टीका देखील होत आहे त्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आणि सनी देओलला घेतलं.
खराब अभिनयामुळे अनेक चित्रपट गमावले
दीपकने त्याच्या खराब अभिनयामुळे अनेक चित्रपट गमावले. त्याला कमल सदानासह ‘बेखुदी’, सलमान खानसह ‘सूर्यवंशी’ आणि राहुल रॉयसह ‘जुनून’ या चित्रपटांची ऑफर देण्यात आली होती. पण 1993 पर्यंत त्याच्याकडील चित्रपटांच्या ऑफर्स संपल्या. यानंतर त्याला काम मिळेनासे झाले. त्यामुळे त्याला सर्व काही सोडून अमेरिकेत जावं लागलं. तिथे त्याने स्वत:चं नाव बदलून व्यवसाय सुरू केला.
दीपक मल्होत्रा भारत सोडून अमेरिकेत गेला, नाव बदलल…
दीपक मल्होत्रा भारत सोडून अमेरिकेत गेला आणि प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर राहण्यासाठी, दीपक मल्होत्राने त्याचे नाव बदलून डिनो मार्टेली असे ठेवले. दीपकने तिथेच मॉडेलिंग सुरूच ठेवलं. इतकेच नाही तर त्याने औद्योगिक अभियांत्रिकी आणि डिझायनिंगचाही अभ्यास केला. पण नंतर तो कपड्यांचा व्यवसाय करू लागला. त्याचे नाव माजी सुपरमॉडेल आणि फॅशन शो कोरिओग्राफर लुबना एडमशी देखील जोडले गेले होते. जिच्याशी त्याने नंतर लग्न केले आणि आता त्यांना दोम मुलं आहेत. दोन्ही मुलांनी मॉडेलिंगच्या जगातही प्रवेश केला आहे आणि काही वर्षांपूर्वी मनीष मल्होत्रासाठी त्यांनी मॉडेलिंग देखील केलं आहे. सध्या दीपक अनेक वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये आहे. आज त्याचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे.