‘एआय फॉर ऑल’, एआय क्षेत्रातील दिग्गजांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला कानमंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रमुख सीईओ आणि तज्ज्ञांची बैठक घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवास स्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रमुख सीईओ आणि तज्ज्ञांशी संवाद साधला. फेब्रुवारी महिन्यात भरणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर ही उच्चस्तरिय बैठक आयोजित केली होती. या बैठकीचा उद्देश धोरणात्मक सहकार्य वाढवणे, एआय क्षेत्रातील नवकल्पनांचे सादरीकरण करणे आणि भारताच्या एआय मिशनला गती देणे हा होता. यावेळी उपस्थित सीईओंनी भारताच्या एआय तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याच्या उद्दिष्टाला संपूर्णपणे पाठिंबा दर्शवला. तसेच जागतिक पातळीवर भारताला एआय क्षेत्रातील आघाडीवर नेण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे देखील कौतुक केले.
या बैठकीत सर्व क्षेत्रांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्याचा राष्ट्रीय विकासासाठी उपयोग करण्यावर भर असावा अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी मांडली. त्यांनी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापर करण्याचे आवाहनही केले.
आगामी एआय इम्पॅक्ट परिषदेचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या परिषदेचा उपयोग सर्व कंपन्या आणि व्यक्तींनी नव्या संधी शोधण्यासाठी आणि प्रगतीच्या मार्गावर झेप घेण्यासाठी करावा. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI)च्या माध्यमातून भारताने आपली तांत्रिक क्षमता सिद्ध केली असून, तेच यश एआय क्षेत्रातही मिळवता येईल, असेही मोदी यावेळी सांगितले.
भारताची असलेली प्रचंड लोकसंख्या, विविधता आणि लोकशाही मूल्ये यामुळे भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर जगाचा विश्वास आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. ‘एआय फॉर ऑल’ या दृष्टिकोनानुसार, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभाव निर्माण करण्याबरोबरच जगाला प्रेरणा देण्याची गरज असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जागतिक एआय उपक्रमांसाठी भारताला आकर्षकणाचे केंद्र बनवण्याचे आवाहनही त्यांनी यावळी केले.
डेटा सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाला अत्यंत महत्त्व असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरक्षित एआय संस्था उभारण्याची गरज असून, एआयच्या नैतिक वापरावर कोणतीही तडजोड करता कामा नये, असेही मोदी यांनी ठामपणे सांगितले. तसेच एआय कौशल्य विकास आणि प्रतिभा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारताची एआय परिसंस्था देशाच्या मूल्ये आणि संस्कृतीचे प्रतिबिंब असावे असेही त्यांनी नमूद केले.
या उच्चस्तरीय बैठकीला विप्रो, टीसीएस, एचसीएल टेक, झोहो कॉर्पोरेशन, एलटीआय माइंडट्री, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड, अदानीकॉनिक्स, एनएक्स्ट्रा डेटा आणि नेटवेब टेक्नॉलॉजीज यांसारख्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. तसेच IIIT हैदराबाद, IIT मद्रास आणि IIT मुंबई येथील तज्ज्ञांनीही यात सहभाग घेतला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री जितिन प्रसाद हे देखील या बैठकीला उपस्थित होते.
