Ekta Kapoor : बॉलिवूडमध्ये हिंदूफोबिया…धर्माबद्दल एकता कपूरचं वादग्रस्त विधान
Ekta Kapoor : एकता कपूर तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. अशातच आता एकतानं धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

निर्माती एकता कपूर सध्या ‘द वन’च्या यशामुळे चर्चेत आहे. तिनं टेलिव्हिजन आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत मोठे यश मिळवलं आहे. टेलिव्हिजन आणि सिनेमा क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेली एकता कपूर आपल्या धर्माचं पालन करते. एकताला अध्यात्म, ज्योतिष आणि अंकशास्त्रामध्ये केवळ सखोल रसच नाही, तर तिचा त्यावर दृढ विश्वासही आहे. एकता कपूर म्हणते की, भारतीय चित्रपटसृष्टी मोठ्या प्रमाणावर पाश्चात्य संस्कृतीचं अनुसरण करत असली तरी, येथील लोकांना अजूनही हिंदू चालीरीती स्वीकारायला संकोच वाटतो.
चित्रपटसृष्टीत ‘हिंदू फोबिया’ मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे!
धर्म, लोककथा किंवा संस्कृतीच्या बाबतीत लोक कसे दुटप्पी वागतात यावर बोलताना एकता कपूर म्हणाली, ‘चित्रपटांनी चांगले पैसे कमावणं ठीक आहे. मी हे कॅमेऱ्यासमोर उघडपणे सांगत आहे. आमच्या चित्रपटसृष्टीत इतका ‘हिंदूफोबिया’ आहे की, आम्ही ॲनिमेटेड चित्रपटांबाबत निश्चिंत आहोत, पण पौराणिक कथा आणि लोककथांबद्दल बोलताना आम्हाला संकोच वाटतो.’
याबद्दल बोलताना एकता कपूर म्हणाली की, तिला या कथा उघडपणे लोकांसमोर आणायच्या होत्या आणि लोकांना त्या स्वीकारायला लावायच्या होत्या. लोक आता पूर्वीपेक्षा खूप जास्त स्वीकारणारे झाले आहेत. एकता कपूर म्हणाली, ‘आजही आपली धार्मिक ओळख उघडपणे दाखवणं आणि टिळा लावणं किती कठीण आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. एकदा तर मंदिरातून थेट क्लबमध्ये गेल्यामुळेही माझ्यावर टीका झालेली.’ लोक सामाजिक चालीरीती आणि धार्मिक श्रद्धा यांना वेगवेगळ्या गोष्टी म्हणून पाहतात. काहींच्या मते, या दोन गोष्टी एकत्र असू शकत नाहीत का? असा सवालही एकतानं केला. रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत एकता बोलत होती.
दरम्यान, दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित ‘द वन’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहेत. एकता कपूर निर्मित, हा सिनेमा बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील बिहटा जवळील माँ वन देवी मंदिराभोवतीच्या लोककथेभोवती फिरतो. तसंच एकता कपूर सध्या सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘विवान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
