
प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सिझनचा विजेता एल्विश यादवच्या गुरुग्राम इथल्या घरावर रविवारी सकाळी अज्ञातांनी गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विशच्या घरावर एकानंतर एक 24 गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर एल्विशसह त्याचे कुटुंबीय भीतीच्या छायेत आहेत. अशातच त्याच्या घराबाहेरील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दरवाजा आणि भिंतींवर गोळ्यांचे निशाण पहायला मिळत आहेत.
एल्विश यादवच्या घराचा हा व्हिडीओ त्याच्याच एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. ‘संपूर्ण कुटुंबीय सुरक्षित आहेत’ असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. एल्विशच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी भाऊ गँगने घेतली आहे. भाऊ गँगच्या नीरज फरीदपूर आणि भाऊ रितौलिया यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटलंय, ‘एल्विश यादवने बेटिंग अॅपला प्रमोट करून अनेक घरं उद्ध्वस्त केली आहेत. याची किंमत त्याला चुकवावीच लागेल.’
एल्विश यादव हा आता फक्त युट्यूबरच नाही तर टीव्ही आणि ग्लॅमर विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. दर महिन्याला तो लाखो रुपये कमावतो. नुकतंच त्याने गुरुग्राममध्ये आलिशान घर बांधलं होतं. या 16BHK च्या घराचं इंटेरिअर त्याने अत्यंत कमालिचं केलं होतं. या घराची किंमत दहा कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय दुबईमध्येही त्याचं आठ कोटी रुपयांचं घर आहे.
एल्विशच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यानेही पोलिसांवर विश्वास व्यक्त केला आहे. एल्विशच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा एक सीसीटीव्ही फुटेजसुद्धा समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ती बाईकवर बसलेली आणि दोन जण घराच्या गेटवर उभे राहून गोळीबार करत असल्याचं पहायला मिळत आहे. गोळीबाराच्या घटनेवेळी एल्विश त्याच्या घरात नव्हता. परंतु त्याचे कुटुंबीय घरातच होते. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. गुरुग्राममधील एल्विशच्या घरी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे. गोळीबाराच्या खुणा आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी ही टीम पोहोचली आहे.