Dawood Ibrahim : ‘धुरंधर’मध्ये दाखवलेला दाऊद इब्राहिम खोटा! तो आजही…माजी FBI एजंटचा मोठा दावा
Dawood Ibrahim Truth : माजी एफबीआय एजंटनं दाऊद इब्राहिमबद्दल मोठा दावा केला असून 'धुरंधर' सिनेमात दाखवलेला दाऊद इब्राहिम खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची झलक दाखवण्यात आली आहे. मात्र, चित्रपटात दाखवण्यात आलेला दाऊद आणि प्रत्यक्षातील दाऊद यांच्यात मोठा फरक असल्याचा दावा अमेरिकेच्या तपास यंत्रणेतील माजी FBI ऑपरेटिव्ह कामरान फरीदी यांनी केला आहे. ‘धुरंधर’मध्ये दाऊदला आजारी, वृद्ध आणि असहाय्य अवस्थेत दाखवण्यात आलं आहे. मात्र, प्रत्यक्षात तो आजही सक्रिय असून पाकिस्तानात राहून आपलं नेटवर्क चालवत असल्याचं कामरान यांनी म्हटलं आहे.
‘धुरंधर’मधील दाऊदची प्रतिमा चुकीची?
आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ चित्रपटात अभिनेता दानिश इक्बाल यानं दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दाऊदला ‘बडे साहब’ या नावानं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात तो वृद्ध आणि आजारी असून अंथरुणाला खिळल्याचं पाहायला मिळतं. मात्र, कामरान फरीदी यांच्या दाव्यानुसार, दाऊदची प्रत्यक्षातील परिस्थिती यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तो आजही आपल्या गुन्हेगारी नेटवर्कवर नियंत्रण ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं. कामरान फरीदी यांनी ‘आज तक रेडिओ’च्या ‘क्राइम ब्रांच’ पॉडकास्टमध्ये होस्ट अरविंद ओझा यांच्याशी संवाद साधताना हे दावे केले आहेत.
दाऊदच्या दुसऱ्या लग्नाबाबतही केला दावा
कामरान यांनी दाऊदच्या खासगी आयुष्याबाबतही काही धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दाऊदनं स्वतःपेक्षा वयानं खूप लहान असलेल्या तरुणीशी दुसरं लग्न केलं आहे. इतकंच नाही, तर दाऊद कोकेनच्या आहारी गेल्याचाही दावा त्यांनी केला आहे. दाऊद आणि त्याची डी-कंपनी भारत तसेच पाकिस्तानमध्ये अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंधित असल्याचंही कामरान यांनी म्हटलं आहे.
दाऊद सध्या पाकिस्तानातच राहत असल्याचा दावा कामरान यांनी केला आहे. पाकिस्तानात त्याची तीन गुप्त ठिकाणं असून भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला की तो आपलं ठिकाण बदलतो, असंही त्यांनी सांगितलं. दाऊदच्या सुरक्षेची जबाबदारी छोटा शकील सांभाळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दाऊदच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती छोटा शकील दर शुक्रवारी पाकिस्तानच्या ISI मुख्यालयात देत असल्याचंही कामरान यांनी म्हटलं आहे.
दाऊदच्या पार्ट्यांमध्येही सहभागी झाल्याचा दावा
कामरान यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये काम करत असताना त्यांची दाऊदशी अनेकदा भेट झाली होती. इतकंच नाही, तर ते दाऊदसोबत अनेक पार्ट्यांमध्येही सहभागी झाले होते. दाऊद स्वतःला धार्मिक व्यक्ती म्हणून दाखवत असला, तरी प्रत्यक्षात त्याला आलिशान जीवनशैली जगण्याची सवय झाली आहे, असं कामरान यांनी सांगितलं.