Poonam Pandey | पूनम पांडेच्या घराला आग, अपार्टमेंट जळून खाक; पाळीव श्वानाला वाचवण्यात यश

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या मुंबईतील अपार्टमेंटला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. पूनमचा पाळीव श्वान सीजर यालासुद्धा सुरक्षितरित्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे.

Poonam Pandey | पूनम पांडेच्या घराला आग, अपार्टमेंट जळून खाक; पाळीव श्वानाला वाचवण्यात यश
Poonam Pandey
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 16, 2023 | 9:19 AM

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री पूनम पांडेच्या मुंबईतील अपार्टमेंटला आग लागली आहे. या आगीचे फोटो आणि व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुदैवाने ज्यावेळी आग लागली, त्यावेळी पूनम घरात नव्हता. मात्र तिला पाळीव श्वान घरात होता आणि त्याला सुरक्षितरित्या घरातून बाहेर काढण्यात आलं. ही आग लागली कशी, याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पूनम मुंबईतील एका इमारतीतील 16 व्या मजल्यावर राहते. तिच्या याच अपार्टमेंटमध्ये ही आग लागली.

पापाराझी विरल भयानीने पूनमच्या अपार्टमेंटचा फोटो शेअर करत आगीच्या घटनेविषयी माहिती दिली आहे. विरलने लिहिलंय की ही घटना तेव्हा घडली, जेव्हा पूनम तिच्या घरात नव्हती. मात्र तिचा पाळीव श्वान सीजर घरात होता. पूनमच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणीने सीजरला वाचवलं आणि सध्या पूनमची बहीण त्याचा देखभाल करत आहे. ही आग कशी लागली याचा तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ज्यावेळी पूनमच्या घरात आग लागली, तेव्हा सोसायटीमधल्या राजन नावाच्या एका व्यक्तीने ताबडतोब ती आग विझवण्याचा आधी प्रयत्न केला. त्याचवेळी त्याने अग्निशमन दलाला बोलावून घेतलं. आगीच्या घटनेबद्दल अद्याप पूनमकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. पूनमने घटनेच्या काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यात तिने लिहिलं होतं की ती चाहत्यांना लवकरच एक चांगली बातमी देणार आहे. यासोबतच पूनमने एका शूटचा फोटो पोस्ट केला होता.

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिने कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले होते. पूनम तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

पूनमने 2013 मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती, जिचे तिच्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असतात. या चित्रपटानंतरचा काळ खूप कठीण असल्याचं सांगत पूनम ‘लॉक अप’ या शोमध्ये म्हणाली होती, “त्या चित्रपटानंतर मला ज्या काही ऑफर्स येत होत्या ते मी घेऊ नये असं अनेक लोक सांगू लागले. मला अभिनय करायचं आहे, चित्रपटांमध्ये काम करायचं आहे असं मी त्यांना सांगू इच्छिते. मी उत्तम डान्सर आहे आणि अभिनेत्रीसुद्धा आहे, हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे. चुकीचे निर्णय घेऊन माझी दिशाभूल झाली. पण आता मी योग्य मार्ग निवडणार आहे.”