सौरव गांगुली यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक; राजकुमार रावला पाहून नेटकरी म्हणाले..

प्रतिभाशाली क्रिकेटर ते भारताच्या सर्वांत प्रभावशाली कर्णधारांमध्ये समाविष्ट असलेले सौरव गांगुली यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. मात्र त्यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सौरव गांगुली यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक; राजकुमार रावला पाहून नेटकरी म्हणाले..
Rajkummar Rao and Sourav Ganguly
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 08, 2026 | 1:21 PM

‘दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुली यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी गांगुली यांच्या वाढदिवसानिमित्त या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘दादा : द सौरव गांगुली स्टोरी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये अभिनेता राजकुमार राव हा गांगुलींच्या भूमिकेत दिसून येत आहे. 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीतून सौरव गांगुली यांनी जर्सी फडकावली होती. तोच ऐतिहासिक क्षण या पोस्टरमध्ये पहायला मिळतोय. हा क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत अविस्मरणी क्षणांपैकी एक मानला जातो. मात्र या पोस्टरवर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे नेटकऱ्यांनी या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे पोस्टरच्या गुणवत्तेवरून टीकासुद्धा केली आहे. ‘एखाद्या चाहत्याने यापेक्षा चांगला पोस्टर बनवला असता’, असं एकाने लिहिलं. तर ‘चॅटजीपीटीने चांगलं काम केलं असतं’, असा टोला दुसऱ्याने लगावला. ‘चाहत्यांनी बनवलेले पोस्टर यापेक्षा चांगले असतात’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. ‘हे अधिकृत पोस्टर आहे का? यापेक्षा आम्ही शाळेतले प्रोजेक्ट उत्तम बनवायचो’, अशा शब्दांत या पोस्टरला ट्रोल केलं जात आहे. नेटकऱ्यांच्या मते या पोस्टरचं एडिटिंग व्यवस्थित करण्यात आलेलं नाही.

पहा पोस्टर-

भारतीय फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवल्यानंतर फ्लिंटॉफने जल्लोष साजरा करण्यासाठी त्याचा शर्ट काढला होता. भारतीय क्रिकेट संघासाठी तो कठीण सामना होता, पण अखेर विजय झाला. त्यावेळी सौरव गांगुली यांनी फ्लिंटॉफला प्रत्युत्तर देण्यासाठी अशा प्रकारे जल्लोष केला होता. गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटसाठी एका नवीन आणि निर्भय युगाची सुरुवात याच क्षणाने दर्शविली होती.
‘दादा : द सौरव गांगुली स्टोरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम आदित्य मोटवाने करत आहेत. हा बायोपिक 14 मे 2027 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात एका अशा व्यक्तीशी प्रेरणादायी कथा आहे, जो फक्त क्रिकेट खेळला नाही, तर त्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला. या चित्रपटात एका प्रतिभावान तरुण क्रिकेटरपासून ते भारताच्या सर्वांत प्रभावशाली कर्णधारांपैकी एक बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

Follow Us