
काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनी त्यांच्या ‘टू मच’ या टॉक शोमध्ये मॉडर्न लग्न, नातेसंबंध आणि फसवणूक यांविषयी मोकळेपणे आपली मतं मांडली होती. या दोघींनी शोमध्ये अशी काही वक्तव्ये केली होती, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. लग्न आणि प्रामाणिकपणा या विषयांवरील चर्चेदरम्यान दोघींनीही सांगितलं की शारीरिक संबंधांमधील विश्वासघातामुळे नेहमीच नात्याचा अंत होत नाही. “रात गई, बात गई” अशा अंदाजात ट्विंकलने उत्तर दिलं होतं. त्यांच्या याच मतांवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. याच मतांवर आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री गौतमी कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौतमीला नातेसंबंधांमधील शारीरिक धोकेबाजी किंवा विश्वासघाताला माफ केलं जाऊ शकतं का, असा प्रश्न विचारण्यात आला.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत गौतमी स्पष्टपणे म्हणाली, “मी ज्याप्रकारची व्यक्ती आहे, त्यावरून माझ्या मते शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारचा विश्वासघात हा विश्वासघातच आहे. मी लोकांच्या विविध मतांचा आदर करते, पण माझ्या मर्यादा खूप स्पष्ट आहेत. शारीरिक, भावनिक, अध्यात्मिक किंवा इतर काही असो.. धोकेबाजी ही धोकेबाजीच असते. मी त्या दोघींच्या दृष्टीकोनाचा आदर करते, पण माझे विचार असे आहेत. यातही मला काही चुकीचं वाटत नाही.”
“मी फार पझेसिव्ह व्यक्ती आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी माझ्या पती, मित्रमैत्रिणी, मुलं आणि इतकंच काय तर माझी टीम, आसपासची लोकं यांबाबत मी खूप पझेसिव्ह आहे. जेव्हा तुम्ही त्या नात्यात फार गुंतवणूक करता, तेव्हा त्यातून तुमच्यात पझेसिव्हनेसची भावना निर्माण होते. कारण मी अत्यंत प्रामाणिक आहे, त्यामुळे मी प्रत्येक नात्यात माझे 500 टक्के देते. एकदा का विश्वासघात झाला की ते खूप मोठं ओझं बनून राहतं. ते फक्त शारीरिक होतं असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. हे इतरांसाठी ठीक असेल, पण माझ्यासाठी अजिबात नाही”, असं मत गौतमीने व्यक्त केलं. शारीरिक विश्वासघाताने नातं संपुष्टात येत नसल्याचं वक्तव्य काजोलने केलं होतं.
मॉडर्न नात्यांबद्दल बोलताना गौतमीने सहनशीलतनेची कमतरता असल्याचं स्पष्ट केलं. “आधी लोक म्हणायचे की चला, ही समस्या सोडवुया. आज पहिल्या भांडणावरच लोक विभक्त होण्याच्या गोष्टी करतात. यामागचं कारण म्हणजे तुमच्यातील सहनशीलता कमी होत जातेय. तुमच्याकडे खूप सारे पर्याय आहेत, आकर्षणं आहेत. मी त्या पिढीची नाही, जी फार लवकर हार मानत असेल. जर तुम्ही योग्य कारणांसाठी लग्न करत असाल तर कदाचित आणखी एक संधी दिली जाऊ शकते. आजकालची पिढी वेळ, धैर्य आणि नात्यांना यशस्वी बनवण्याच्या क्षमतेची कमतरता यांच्याशी झुंज देतेय”, असं गौतमी पुढे म्हणाली.